निवासी कार्यक्रम चांगला, मात्र पायाभूत सुविधा पुरवा; राज्यातील मार्ड संघटनेची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 09:53 AM2022-12-27T09:53:15+5:302022-12-27T09:53:43+5:30
‘राज्यातील जिल्हा रुग्णालयांना मिळणार ४,९५७ स्पेशल निवासी डॉक्टर मिळणार’ या शीर्षकाखाली लोकमतमध्ये २५ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा बळकट व्हावी, याकरिता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांच्या तीन वर्षांच्या अभ्यासकाळात तीन महिने जिल्हा रुग्णालयांत काम करावे लागेल, असे निर्देश देणारे परिपत्रक जारी केले होते. या निर्णयाचा राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) स्वागत केले आहे. त्यांनी हा उपक्रम चांगला आहे. मात्र, ज्यावेळी डॉक्टर तेथे सेवा देण्यासाठी जातील, त्यावेळी त्या रुग्णालयात पायाभूत सुविधा तेथील प्रशासनाने पुराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
‘राज्यातील जिल्हा रुग्णालयांना मिळणार ४,९५७ स्पेशल निवासी डॉक्टर मिळणार’ या शीर्षकाखाली लोकमतमध्ये २५ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये जिल्हा निवासी कार्यक्रमांतर्गत पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या सत्रात असलेल्या निवासी डॉक्टरांना रोटेशन पद्धतीने ही सेवा देणे बंधनकारक आहे, असे म्हटले होते.
या कार्यक्रमांतर्गत निवासी डॉक्टरांची राहण्याची सोय जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात किंवा रुग्णालयाच्या २ ते ३ किलोमीटरच्या परिसरात करणे अपेक्षित आहे. देशातील सर्व शासकीय, खासगी, अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व पदव्युत्तर महाविद्यालयांना हा उपक्रम बंधनकारक आहे.
‘राहण्याची व्यवस्था योग्य असावी’
या प्रकरणी राज्यातील निवासी डॉक्टर संघटेनेचे अध्यक्ष डॉ.अविनाश दहिफळे यांनी सांगितले की, “केंद्र शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे शहरी भागातील वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना ग्रामीण भागातील रुग्णसेवेचा अनुभव मिळेल. तेथील रुग्णांना याचा नक्कीच फायदा होईल. मात्र, हा उपक्रम राबविताना ज्यावेळी विशिष्ट शाखेचा डॉक्टर तेथे सेवा देण्यासाठी जाईल, त्यावेळी त्याला गरजेची असणारी साधनसामुग्री आणि औषधे रुग्णालयात उपलब्ध असतील, याची काळजी दक्षता घेणे गरजेचे आहे, तसेच रुग्णालयांनी डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था योग्य पद्धतीने होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"