लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडाच्या अतिधोकादायक २१ उपकरप्राप्त इमारतींची बुधवार आणि गुरुवार अशी दोन दिवस पाहणी केली जाणार असून, इमारतीची परिस्थिती लक्षात घेता तेथील रहिवाशांना आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे वितरण करण्याचा निर्णयदेखील तत्काळ घेतला जाईल. या इमारतींमध्ये ४६० निवासी व २५७ अनिवासी असे ७१७ रहिवासी आहेत. १९३ रहिवाशांनी त्यांची स्वतःची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. २० निवासी रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित २४७ निवासी रहिवाशांना निष्कासनाच्या सूचना देऊन गाळे खाली करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
म्हाडाने यावर्षी २१ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. पावसाळा लक्षात घेता या इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेकरिता आता दोन दिवस उपमुख्य अभियंता व आवश्यकतेनुसार अधिकारी यांचे पथक दक्षिण मुंबईतील धोकादायक इमारतींना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहेत. पहिल्या दिवशी दहा इमारतींची पाहणी होणार असून दुसऱ्या दिवशी ११ इमारतींची पाहणी केली जाईल. इमारतीची परिस्थिती लक्षात घेता तेथील रहिवाशांना आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे वितरण करण्याचा निर्णय देखील तत्काळ घेतला जाईल. इमारतींतील रहिवाशांना मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन व सुरक्षेच्या दृष्टीने मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत जागरूक करण्यात येईल, जेणेकरून अपघातामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत १४ हजार ७५५ उपकर प्राप्त इमारती आहेत. दरवर्षी इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार मे महिन्याअखेरपर्यंत ९ हजार ४८ उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र आता हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून २१ इमारती अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. अतिधोकादायक २१ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या १० इमारतींचा समावेश आहे. अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील रहिवाशांची जीवित तथा वित्तहानी टाळण्यासाठी मंडळातर्फे आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे.
अशी होणार कार्यवाही
- मंडळाच्या चारही झोनमध्ये ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत.
- इमारतीच्या धोक्याची लक्षणे निदर्शनास आल्यास ठेकेदारामार्फत तत्काळ आपत्ती निवारणाबाबत कार्यवाही केली जाईल.
- नियंत्रण कक्षातील अधिकारी तत्काळ जागेवर जाऊन इमारतीची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करणार आहेत.
--------------
अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना मंडळातर्फे आवाहन आहे की, त्यांनी मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे. सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जेणेकरून अपघातामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तसेच अपघात घडल्यास तत्काळ नियंत्रण कक्षास सूचित करावे.
- विनोद घोसाळकर, सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, म्हाडा
--------------
मंडळाचा नियंत्रण कक्ष
रजनी महल, पहिला मजला, ८९ - ९५, ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई - ४०००३४. दूरध्वनी क्रमांक - २३५३६९४५, २३५१७४२३
भ्रमणध्वनी क्रमांक - ९१६७५५२११२.
--------------
मुंबई महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष
पालिका मुख्यालय, फोर्ट, मुंबई. दूरध्वनी क्रमांक २२६९४७२५/२७
......................................