Join us

इमारतींचा पुनर्विकास रखडल्याने रहिवाशांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घाटकोपर पूर्व आणि पश्चिम येथील नौदलाच्या ५०० मीटर परिसरात येणाऱ्या जवळपास ३५० इमारतींचा पुनर्विकास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घाटकोपर पूर्व आणि पश्चिम येथील नौदलाच्या ५०० मीटर परिसरात येणाऱ्या जवळपास ३५० इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. या इमारतींमधील रहिवाशांनी रविवारी एकत्र येत आंदोलन केले. मुंबईत महानगरपालिका, म्हाडा, राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या जाचक अटींमुळे घाटकोपरमधील अनेक वसाहतींचे काम रखडले आहे. तसेच नौदलाने परवानगी न दिल्याने घाटकोपर पूर्व आणि पश्चिमेला असणाऱ्या ३५० हून अधिक इमारतींचा पुनर्विकास ७ वर्षांपासून रखडला आहे, असे या रहिवाशांचे म्हणणे आहे. या वेळी नागरिकांनी फलक हातात घेत व घोषणा देत आंदोलन केले. तसेच इमारतींच्या पुनर्विकासास परवानगी न मिळाल्यास येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा रहिवाशांतर्फे देण्यात आला.

घाटकोपर पश्चिमेस नौदलाचे साधन सामग्रीचे कार्यालय आहे. या कार्यालयातर्फे परिसरातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी हरकत घेतली जात आहे. जीर्ण झालेल्या इमारतींना पालिकेने धोकादायक घोषित केले आहे. तर नवीन बांधकाम करण्यास घेतलेल्या इमारतींना नौदलाकडून परवानगी मिळत नसल्याने बांधकामदेखील रखडले आहे. परिणामी, निष्कासित केलेल्या इमारतींमधील राहिवाशांना भाड्याने राहावे लागत आहे. नौदलाच्या पाचशे मीटर परिसरातील इमारतींमधील रहिवासी इमारतीच्या पुनर्विकासासाठी पालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. इमारतीच्या पुनर्विकासास परवानगी मिळत नसेल तर आम्ही सर्व रहिवासी मतदानावर बहिष्कार घालतो, असे रहिवाशांच्या वतीने सांगण्यात आले.

Attachments area