Join us

रहिवाशांचा आगीपेक्षा धुराने मृत्यू; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 8:52 AM

मुंबई : इमारतीत ज्यावेळी आगीची दुर्घटना घडून नागरिक मृत्युमुखी पडतात त्यावेळी आगीने भाजल्यामुळे अनेकांचे मृत्यू होत असतात. मात्र, गोरेगावमधील ...

मुंबई : इमारतीत ज्यावेळी आगीची दुर्घटना घडून नागरिक मृत्युमुखी पडतात त्यावेळी आगीने भाजल्यामुळे अनेकांचे मृत्यू होत असतात. मात्र, गोरेगावमधील दुर्घटनेत जे सात मृत्यू झाले आहेत, त्यामध्ये आगीमुळे निर्माण झालेला धूर त्या नागरिकांच्या फुप्फुसात गेल्यामुळे हे मृत्यू झाले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.  

कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले की, जे रुग्ण दोन्ही रुग्णालयांत दाखल झाले आहेत त्यामधील बहुतांश व्यक्तींना ऑक्सिजनची गरज भासत आहे. यापैकी फार कमी लोकांना आगीच्या जखमा दिसून आल्या आहेत. अन्य बहुतांश रुग्णांच्या छातीत धूर गेल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांना पुढील उपचाराकरिता दाखल करून घेण्यात आले, असेही मोहिते म्हणाले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेश सुखदेवे यांनी सांगितले की, मी  रुग्णालयातील रुग्ण पहिले. त्यामध्ये बहुतांश नागरिक श्वसन विकाराच्या तक्रारी घेऊन आले. त्यापैकी एका तीन महिन्यांच्या मुलीच्या आणि अडीच वर्षांच्या मुलाच्या पायावर भाजल्याच्या जखमा आहेत. त्यांना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

पाण्याची कायम बोंबाबोंब

सध्या जी इमारत उभी आहे त्या ठिकाणी जय भवानी नावाची मोठी झोपडपट्टी होती.  झोपटपट्टी पुनर्वसन योजनेतून आम्हाला सात मजल्यांची इमारत बांधून देण्यात आली. या इमारतीच्या एका मजल्यावर नऊ रूम आहेत. लिफ्ट आहे; पण नावापुरतीच. ५०० रुपये महिन्याला भाडे आहे, मात्र पाण्याची बोंबाबोंब आहे. आम्ही बाहेरून पाणी आणतो.

टॅग्स :आग