गोरेगाव न्यू म्हाडा वसाहतीतील रहिवासी मर्कटलीलेमुळे हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:35 AM2021-02-05T04:35:14+5:302021-02-05T04:35:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोरेगाव पूर्वकडील न्यू म्हाडा वसाहत व नागरी निवारा परिषद येथील परिसरांमध्ये माकडांचा मोठ्या प्रमाणात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव पूर्वकडील न्यू म्हाडा वसाहत व
नागरी निवारा परिषद येथील परिसरांमध्ये
माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढलेला आहे.
मर्कटलीलेमुळे येथील रहिवासी कमालीचे
हैराण झाले आहे. आधीच कोरोनामुळे गेली दहा महिने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता या माकडांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे येथील स्थानिक रहिवासी मोठ्या दहशतीखाली असून, सदर माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी श्री समर्थ फेडरेशनच्या वतीने न्यू म्हाडा इमारत क्र. २-३ फेडरेशनचे अध्यक्ष सुनील थळे व सरचिटणीस प्रकाश येजरे यांनी वनविभाग अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली पूर्व कार्यालयाकडे केली आहे.
येथील परिसरांत गेल्या १० ते १२ महिन्यांपासून माकडांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला आहे. सकाळ होताच इमारत क्रमांक १ पासून ते थेट इमारत क्रमांक २८ पर्यंतच्या नागरिकांच्या घरात माकडे शिरत असून,
दिवसभर हा सिलसिला सुरूच असतो. माकडांच्या या उपद्रवामुळे परिसरातील वस्तूंची नासधूस करत आहेत. तसेच इमारतीमधील घरांमध्ये घुसून सामानाचं, महत्त्वाच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. इतकेच नव्हे तर काही घरांमध्ये घुसून माकडांनी छोट्या मुलांना इजा पोहोचविल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मर्कटलीलेतून सदर परिसर मुक्त कारण्याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी श्री समर्थ फेडरेशन ई. क्र. २/३ न्यू म्हाडा कॉलनी यांनी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांच्याकडे सुद्धा केली आहे.
---------------------------------------------