Join us

बीडीडीतील चाळकरी वर्षअखेरपर्यंत नव्या घरात; पुनर्विकासाच्या कामांना आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:48 AM

वरळीमधील बीडीडीच्या कामाने चांगलाच वेग पकडला आहे.

मुंबई :म्हाडातर्फे डिलाईल रोड, दादर आणि वरळी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले असून, वरळीमधील बीडीडीच्या कामाने चांगलाच वेग पकडला आहे. विशेषत: बांधकामाचा हा वेग कायम राहिला तर डिसेंबर २०२४ पर्यंत चाळ क्रमांक ३०, ३१, ३६, ८, ९, ११ मधील रहिवाशांना हक्काच्या घरात प्रवेश करता येणार आहे.

अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरळी पोलिस मैदान येथील ८ विंगचे बांधकाम वेगात सुरू असून, डी आणि ई विंगच्या फिनिशिंगच्या कामाला सुरूवात झाली आहे. उर्वरित विंगचे बांधकामही वेगाने सुरू असून, डिसेंबर २०२४ पर्यंत ३०, ३१, ३६, ८, ९, ११ इमारतींमधील रहिवासी स्वत:च्या हक्काच्या ५०० चौरस फुटांच्या घरात राहण्यास जातील. बीडीडी चाळ क्रमांक ३४, ३५, ३७, ३८ या इमारतींमधील रहिवासी भाडे स्वीकारून स्थलांतरित होत आहेत. लवकरच या इमारती पुढील बांधकामासाठी पाडण्यात येतील. तेथे पार्किंगसाठी बांधकाम सुरू करण्यात येईल.  साने गुरूजी मैदान सभोवतालच्या १०४, १०८, १०९ या इमारती रिकाम्या करून पाडण्यात आल्या. शिवाय ९०, ९१, ९२, ९३ मधील रहिवासी भाडे स्वीकारून स्थलांतरित होत आहेत.

पार्किंगचा मुद्दाही लागणार मार्गी -

हॉस्टेल चाळ क्रमांक ११६, ११७ मधील मैदानात बांधकामाला सुरूवात झाली आहे. लवकरच बीडीडी चाळ क्रमांक ७८ ते ८२ व  ५७ ते ६१ या इमारतींबाबत लॉटरी काढून त्यांचेसुद्धा पुनर्वसन करण्याबाबत म्हाडा अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. तसेच पार्किंगचा मुद्दा वरळी येथे मार्गी लागत असून, संघटनेमार्फत प्रशासन स्तरावर याचा पाठपुरावा करण्यात येत आहे, असेही अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीकडून सांगण्यात आले.

टॅग्स :मुंबईम्हाडा