जुहू कोळीवाड्यात पाण्यासाठी रहिवाशांची वणवण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 09:29 PM2024-06-03T21:29:06+5:302024-06-03T21:29:26+5:30
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पिण्याचे पाणी नाही
श्रीकांत जाधव / मुंबई : गर्भ श्रीमंतांचे बंगले आणि टॉवरच्या विळख्यात दडलेल्या सांताक्रूझ जुहू कोळीवाड्यात रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज वणवण सुरू आहे. येथे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून महापालिकेकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरू आहे.
सांताक्रूझ ( पश्चिम ) येथील जुहू चौपाटी परिसरात जुना कोळीवाडा आहे. वाढत्या शहरीकरणात कोळीवाड्याच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कोळीवाड्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे.
स्थानिक रहिवाशांना दररोजच्या पाण्यासाठी बोरवेलवर धाव घेत दिवसभर रांगा लावून पाणी मिळवावे लागते. पालिकेचे पिण्याचे पाणी गढूळ असल्याने त्याचा वापर करणे कठीण झाले आहे. जास्तीचे पैसे मोजून रहिवाशी पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. अशी दारुण अवस्था असताना महापालिका त्याची दखल घेत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
- पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही येथील पालिका अधिकारी अमित पाटील यांची भेट घेतली. त्याना आमच्या समस्या सांगितल्या आहेत. त्यांनी पाण्यासाठी टँकर पाठवतो असे सांगितले. मात्र, अद्याप पाणी आलेले नाही. पालिकेचे पाण्याचे बिल भरून सुद्धा आम्हाला पिण्यास पाणी नाही. - संताना डिसोजा रहिवासी जुहू कोळीवाडा