"रहिवासी भीतीच्या छायेत...", महाकाय होर्डिंग हटवण्याची आदित्य ठाकरेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 05:47 PM2024-08-03T17:47:58+5:302024-08-03T17:48:53+5:30
होर्डिंगच्या लोखंडी ढाच्यामुळे लोअर परळकरांचा जीव टांगणीला लागला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका प्रशासनाने तातडीने शहरातील मोठमोठी होर्डिंग काढली. तसेच काही बेकायदेशीर होर्डिंग्जवर देखील कारवाई केल्याचे पालिकेने सांगितले. मात्र, आता ही मोहीम थंडावली असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत काही ठिकाणचे मोठे होर्डिंग्ज हटवले नसल्याचे दिसते. अशाच एका होर्डिंगच्या लोखंडी ढाच्यामुळे लोअर परळकरांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिका काही कार्यवाही करताना दिसत नाही.
या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत पालिकेकडे याबाबत लवकर हालचाली करण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, "लोअर परळ येथील खिमजी नागजी चाळ क्र. २ च्या शेजारीच जनता कंपाऊंडच्या मालकाद्वारे महाकाय लोखंडी होर्डिंग उभारण्यात आले आहे. हे होर्डिंग ६० फूट पेक्षा अधिक उंच आहे. नुकतीच घाटकोपर, कल्याण येथे घडलेल्या होर्डिंग दुर्घटना आणि त्यामध्ये झालेली जीवितहानी लक्षात घेता; येथील रहिवासी भीतीच्या छायेत राहत आहेत."
याचबरोबर, "आपण ह्यासंदर्भात महापालिका आयुक्त भूषण गगरानी जी ह्यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्या महाकाय होर्डिंगवरील जाहिरात काढून टाकण्यात आली मात्र हा लोखंडी ढाचा अजूनही तसाच आहे. ह्यामुळे भविष्यात होणारी हानी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा धोकादायक लोखंडी ढाचा लवकरात लवकर हटवण्यात यावा. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी", अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी पोस्टद्वारे केली आहे.
लोअर परळ येथील खिमजी नागजी चाळ क्र. २ च्या शेजारीच जनता कंपाऊंडच्या मालकाद्वारे महाकाय लोखंडी होर्डिंग उभारण्यात आले आहे. हे होर्डिंग ६० फूट पेक्षा अधिक उंच आहे. नुकतीच घाटकोपर, कल्याण येथे घडलेल्या होर्डिंग दुर्घटना आणि त्यामध्ये झालेली जीवितहानी लक्षात घेता; येथील रहिवासी… pic.twitter.com/IAkkc8jIM7
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 2, 2024
घाटकोपरसारखी दुर्घटना या ठिकाणीही कधीही घडू शकते, अशी भीती येथील रहिवाशांच्या मनात आहे. यासंदर्भात नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या. मात्र, अद्याप हे होर्डिंग काढण्यात आले नाही. दरम्यान, मुंबईतील घाटकोपर येथील पेट्रोलपंपवर १७ मे रोजी होर्डिंग पडले होते. यामुळे घटनेत होर्डिंगखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. तसेच, दोनच दिवसांपूर्वी कल्याण येथे एक होर्डिंग रिक्षावर कोसळल्याची घटना घडली होती.