Join us  

भांडुप, पवई, विक्रोळीतील रहिवाशांनो, सावधान! पावसाळ्यात घात होऊ शकतो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 11:55 AM

पावसाळ्यात पाण्याच्या जोरदार प्रवाहाने दरडी कोसळण्याची तसेच डोंगरावरून येथील नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत दरवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतो. या पावसात डोंगराळ भागातील दरड कोसळण्याचा धोका असून, पाण्याच्या लोंढ्यामुळे  झोपड्या वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भांडुप, पवई, विक्रोळीतील डोंगराळ परिसरात राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन पालिकेच्या एस विभाग कार्यालयाने केले आहे.

पावसाळ्यात पाण्याच्या जोरदार प्रवाहाने दरडी कोसळण्याची तसेच डोंगरावरून येथील नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिवृष्टीत झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटनाही घडू शकतात. त्यामुळे खबरदारी म्हणून डोंगराळ भागातील स्थानिक रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाशांनी आहे त्या ठिकाणी स्वत:च्या जबाबदारीवर राहावे. नैसर्गिक आपत्तीमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित, वित्तहानी झाल्यास पालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे  ‘एस’ विभागाने स्पष्ट केले आहे.

येथे राहणाऱ्या रहिवाशांना इशाराविक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतमनगर, पासपोली, जयभीमनगर तसेच भांडुप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकरनगर भाग १ व २, नरदासनगर, गावदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कम्पाउंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमाननगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन रोड, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा रोड, खदान विश्वशांती सोसायटी या ठिकाणी डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे.