चेंबूर, गोवंडीमधील रहिवासी जीव मुठीत धरून ओलांडतात रेल्वे मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 09:35 AM2023-04-12T09:35:45+5:302023-04-12T09:35:50+5:30
दरवर्षी डझनभर लोकांना रेल्वे रूळ ओलांडताना जीव गमवावा लागतो.
मुंबई :
रेल्वे मंत्रालयाने देशभरातील बहुतांश मानवी लेव्हल क्रॉसिंगचे मार्ग बंद केले असताना, चेंबूर आणि गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यान येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर झोपडपट्टीतील रहिवाशांना जीव मुठीत धरून रेल्वे रूळ ओलांडावे लागत आहे. त्यामुळे दरवर्षी डझनभर लोकांना रेल्वे रूळ ओलांडताना जीव गमवावा लागतो. मात्र तरीही येथे ओव्हर ब्रिज बांधला जात नसल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन येथे उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी सन २०१६ पासून प्रलंबित आहे. पन्नास हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर आणि निमोनिया बाग या भागातील नागरिकांना चेंबूर सुभाष नगर तसेच चेंबूर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी रूळ ओलांडून जावे लागते. या शॉर्टकटमुळे अनेकदा लोकांना जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येते. महिला काँग्रेसचे जिल्हा सचिव गुलशन बी. खान यांनी सांगितले की, बहुतांश शाळा आणि महाविद्यालये चेंबूर सुभाष नगरच्या दिशेला आहेत. त्यामुळे महिला व शाळकरी मुले दिवसभर रेल्वे रुळ ओलांडताना दिसतात. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी नागरिक रेल्वे रूळ ओलांडतात, त्याठिकाणी रेल्वे विभागाने दिशानिर्देशक बसवलेले नाहीत.
दुसरीकडे स्थानिक नागरिक डॉ. सत्तार खान यांनी सांगितले की,गायकवाड नगर ते चेंबूर स्टेशन जाण्यासाठी सुभाष नगरचा मार्ग जवळचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक व फेरीवाल्यांना रेल्वे रुळ ओलांडावे लागत आहे. चेंबूर स्थानक इतर मार्गापासून दूर आहे. गेल्या पाच वर्षांपासून येथील नागरिक रेल्वे विभागाकडे ओव्हर ब्रिज बांधण्याची मागणी करीत आहेत. त्यासाठी नागरिकांनी स्वाक्षरी मोहीमही राबवली, मात्र त्याचा परिणाम काही झाला नाही. या ओव्हर ब्रिजसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि महापालिका अधिकाऱ्यांना निवेदनेही दिली आहेत.