मजिठीया सोसायटीच्या रहिवाशांचा जीव टांगणीला, दुरुस्तीबाबत कोणताही निर्णय नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:52 PM2023-03-23T12:52:26+5:302023-03-23T12:52:59+5:30
कांदिवली (पश्चिम) येथे मजिठीया नगर सहकारी गृहनिर्माण सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये ६ इमारती ५२ वर्षांपूर्वीच्या आहेत.
मुंबई : बोरिवलीतील गीतांजली इमारत कोसळण्याची घटना ताजी असतानाच कांदिवली पश्चिम येथील मजिठीया नगर सहकारी गृहनिर्माण सोसायटीला महापालिकेने नोटीस देऊनही सोसायटीचे पदाधिकारी इमारत दुरुस्तीबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने येथील हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
कांदिवली (पश्चिम) येथे मजिठीया नगर सहकारी गृहनिर्माण सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये ६ इमारती ५२ वर्षांपूर्वीच्या आहेत. यात २८४ सदनिका आणि १२ दुकाने आणि १ हॉल असून सुमारे १ हजार रहिवासी राहत आहेत. येथे असलेल्या ६ इमारतींना ५२ वर्षे पूर्ण झाल्याने पावसामुळे या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या सहाही इमारतींचे छत कोसळलेले असून भिंतींचे प्लास्टरही पडलेल्या अवस्थेत आहे. तसेच बहुतांश भिंतींना तडे गेले आहेत. अशा जीवघेण्या परिस्थितीत येथे रहिवासी नाइलाजास्तव राहत आहेत.
या इमारतींच्या स्ट्रक्चर ऑडिटनंतर महापालिकेने ३५२ची नोटीस देऊन इमारत रिकामी करून दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र संबंधित कमिटी या नोटीसकडे कानाडोळा करीत आहे. पालिकेच्या आदेशानंतरही कमिटी गंभीर दिसत नसल्याचे रहिवाशांना भीतीच्या वातावरणात येथे राहावे लागत असल्याचे येथील रहिवासी दशरथ शिंदे यांचे म्हणणे आहे. अशी परिस्थिती असताना सोसायटीने रहिवाशांना याबाबत कल्पनाही दिलेली नाही. शिवाय कोणतीही कारवाई करीत नसल्याने भविष्यात गीतांजली इमारतीप्रमाणे येथील इमारतींची दुर्घटना झाल्यास महापालिकेचे अधिकारी आणि सोसायटीचे पदाधिकारी जबाबदार असतील, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
कोणताही वाद नाही
दरम्यान, यासंदर्भात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला असता आम्ही याबाबत पालिकेला उत्तर दिले आहे. तसेच पुनर्विकासाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे. आमच्यात कोणताही वाद नाही. मात्र काही लोक मुद्दाम वाद निर्माण करीत असल्याचे सदस्य एस. मोदी यांनी सांगितले.