Join us

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांना मिळणार ३०० चौ. फुटांची घरे, रहिवाशांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 5:54 AM

Mumbai News: घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास लवकरच मार्गी लागणार असून, या पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींमध्ये झोपडपट्टीधारकांना ३०० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत.

 मुंबई - घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास लवकरच मार्गी लागणार असून, या पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींमध्ये झोपडपट्टीधारकांना ३०० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. एमएमआरडीएकडून लवकरच या पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू केले जाणार असून, त्यासाठी रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले जाणार आहे. तसेच संक्रमण शिबिरांच्या बदल्यात रहिवाशांना घरभाडेही दिले जाईल. त्याच्या धनादेशाचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी पार पडणार आहे.

एमएमआरडीएकडून रमाबाई आंबेडकर नगर येथील ३३.१५ हेक्टर जागेचा विकास करून तेथील अंदाजे १४,४५४ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांच्या संयुक्त भागीदारीत हे पुनर्वसन केले जाणार आहे. या प्रकल्पाचे चार क्लस्टरमध्ये काम केले जाणार आहे. त्यासाठी संदीप शिर्के अँड असोसिएट्स या कंपनीची प्रकल्पाच्या वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना हे कंत्राट ३०६ कोटी रुपयांना देण्यात आले आहे. 

झोपडपट्टीधारकांशी करार  एसआरएच्या माध्यमातून या भागातील बाधित झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यानुसार या प्रकल्पातील अद्यापपर्यंत १४,४५४ पैकी १० हजार रहिवाशांची पात्रता निश्चिती झाली आहे. यातील ६३२७ झोपडपट्टीधारकांशी करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुनर्विकास केल्या जाणाऱ्या क्लस्टरमधील ४०५३ झोपड्यांपैकी २५८० झोपड्यांची पात्रता निश्चिती झाली आहे. तर यातील २,२२२ झोपडपट्टीधारकांशी करार करण्यात आला आहे, अशी माहिती एसआरएमधील अधिकाऱ्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश येत्या काही महिन्यांत या प्रकल्पातील पुनर्विकास केल्या जाणाऱ्या इमारतींच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी झोपडपट्टीधारकांची घरे खाली करून जागा रिकामी करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. घरे रिकामी करण्यापूर्वी झोपडपट्टीधारकांना घरभाडे अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, घरभाड्याच्या धनादेशाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कामराजनगर येथे आयोजित कार्यक्रमात वितरण केले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :घाटकोपरमुंबईसुंदर गृहनियोजन