Join us

गोरेगाव आगीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या रहिवाशांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

By मनोहर कुंभेजकर | Published: October 07, 2023 9:48 PM

रहिवाशांना संसार उभे करण्यासाठी तातडीने ५० हजाराची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आगीत दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोरेगाव उन्नत नगर येथील जय भवानी एसआरए इमारतीतील कुटुबांना आपले संसार सावरण्यासाठी प्रति कुटुंब ५० हजार रुपये तातडीने वितरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज येथे दिले. त्याचबरोबर या इमारतीचा पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देतानाच एसआरएच्या इमारतींना संकटकालीन मार्ग म्हणून बाहेरच्या बाजूने लोखंडी जिने बसविण्यासाठी धोरण तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 

 बैठकीत या इमारतीची पार्ट ओसी घेवून इमारत बांधकामांत दोष असणे, फायर ओसी घेतली आणि आणि अन्य तृटी आढळल्यास या इमारतींच्या बिल्डरची पालिका आयुक्त आणि एसआरए आयुक्तांनी चौकशी करून जर बिल्डर दोषी असेल तर त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

दुर्घटनाग्रस्त जय भवानी एसआरए इमारतीतील रहिवाशांनी आज खासदार गजानन किर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. लोकसभा संपर्कप्रमुख उदय सावंत, शिंदे गटाचे गोरेगाव विभागप्रमुख गणेश शिंदे,विधानसभाप्रमुख मयूर शिंदे जयभावनी इमारतीचे आठ जणांचे शिष्टमंडळ,पालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल,एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, परिमंडळ 4 चे पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार, पी दक्षिण वॉर्डचे सहायक आयुक्त राजेश अक्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी रहिवाशांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. दुर्घटनेतील जखमी  खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची देयके मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून अदा केली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले. या इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल आणि फायर ऑडीट तातडीने करावे. त्यांनतर इमारतीला रंगरंगोटी करावी. इमारतीचा पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरू होण्यासाठी दुरुस्तीच्या कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

या दुर्घटनेतून सावरण्यासाठी आणि आपला संसार पुन्हा उभा करण्यासाठी रहिवाशांना तातडीची मदत देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी प्रति कुटुंब ५० हजार रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. एसआरएच्या इमारती आहेत त्याठिकाणी संकटकालीन मार्ग म्हणून बाहेरून लोखंडी जिने बसविण्यासाठी धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. रहिवाशांना कपड्यांचे गाठोडी ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदाम देण्याची व्यवस्था करण्याचे पालिका प्रशासनाने करावी असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापुढे पार्कींगमध्ये मोकळ्या जागेत गाठोडे ठेवू नका असेही त्यांना सांगण्यात आले.

टॅग्स :गोरेगावएकनाथ शिंदे