Join us

गुढीपाडव्याच्या शोभायात्रांसाठी पश्चिम उपनगरवासी सज्ज! जोगेश्वरी, दिंडोशी, वर्सोवा, गोरेगावात तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 17:35 IST

पश्चिम उपनगरात यंदाही गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी रविवारी विविध ठिकाणी भव्य शोभायात्रांचे आयोजन केले जाणार आहे.

मुंबई

पश्चिम उपनगरात यंदाही गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी रविवारी विविध ठिकाणी भव्य शोभायात्रांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी जोगेश्वरी, दिंडोशी, वर्सोवा, कांदिवली आणि गोरेगाव येथील शोभायात्रा समित्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

उपनगरातील सर्वात उंच गुढी जोगेश्वरी पूर्वेकडील श्यामनगर तलाव येथे उभारण्यात येणार आहे. यावेळी शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा वायकर यांच्या पुढाकाराने होणाऱ्या सकाळी ८ वाजता निघणाऱ्या शोभायात्रेत विविध वाद्यांबरोबरच शिवकालीन मैदानी खेळांचेही सादरीकरण होणार आहे. वर्सोवा येथील श्री स्वामी समर्थनगर येथील नववर्ष स्वागत समितीच्या वतीने ओशिवरा मीरा टॉवर ते स्वामी समर्थनगर न्यू म्हाडा कॉलनीपर्यंत शोभायात्रा काढण्यात येईल. यात चित्ररथ हे विशेष आकर्षण ठरतील, अशी माहिती समितीचे जसपाल सिंग सुरी, अवधेश चौरसिया यांनी दिली. 

दिंडोशी गुढीपाडवा समितीद्वारे रविवारी सकाळी ७ वाजता संतोषनगर म्हाडा कॉलनी ते फिल्म सिटी रोड श्री गणेश मंदिरापर्यंत शोभायात्रा निघणार आहे. यात तब्बल १२० सामाजिक संस्था, मंडळ, फाऊंडेशन, विविध राजकीय पक्ष सहभाग घेणार असल्याची माहिती समितीचे सदस्य सुनील थळे, सीताराम मिस्त्री, नागेश मोरे, नरेंद्र दळवी, आनंद परब यांनी दिली. 

कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्समधील शोभायात्रा रविवारी संध्याकाळी ४ वाजता संस्कृतीस्थित गावदेवी मंदिराकडून आशानगरपर्यंत काढण्यात येईल. गोरेगाव पूर्वेकडील आरे चेकनाक्याजवळील श्रेयस कॉलनी येथील श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाने रविवारी सकाळी ८ वाजता शोभायात्रेचे आयोजन केले आहे. अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निशांत सकपाळ यांनी दिली.

टॅग्स :मुंबई