बिल्डरविरोधात रहिवाशांचा मोर्चा
By admin | Published: November 24, 2014 01:09 AM2014-11-24T01:09:30+5:302014-11-24T01:09:30+5:30
मीरारोडच्या शांतीनगर सेक्टर १ मधील उद्यान व खेळाच्या मैदानासाठी असलेली मोकळी जागा लाटून त्यावर बांधकाम करणा-या बिल्डरविरोधात तेथील रहिवाशांनी मोर्चा काढून त्याचा विरोध केला.
भार्इंदर - मीरारोडच्या शांतीनगर सेक्टर १ मधील उद्यान व खेळाच्या मैदानासाठी असलेली मोकळी जागा लाटून त्यावर बांधकाम करणा-या बिल्डरविरोधात तेथील रहिवाशांनी मोर्चा काढून त्याचा विरोध केला.
सध्या जागांचे भाव गगनाला भिडले असून शहरातील घरांनाही मुंबईतील घरांचा भाव आला आहे. त्यामुळे शहरातील मोकळ्या जागांवर कब्जा करणे, नेहमीचे झाल्याने शहरात विना विवादित मोकळ्या जागांचे प्रमाण नगण्य झाल्याचे दिसून येत आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटासाठी येथील शांतीनगर वसाहत बांधण्यात आली. ही वसाहत त्यावेळी शांती स्टार बिल्डरने विकसित करुन सेक्टर १ मधील विकास मात्र युनिक शांती बिल्डर या नावाने करण्यात आला आहे. येथील बांधकामावेळी बिल्डरने करमणुकीसाठी काही मोकळळ्या जागा सोडल्या आहेत. सध्या याच मोकळळ्या जागा लाटण्याचे कटकारस्थान बिल्डरांकडून रचण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. येथील रिलायन्य एनर्जी कार्यालयाच्या मागे उद्यान व खेळाचे मैदान असलेल्या मोकळ्या जागेत शांती स्टार बिल्डरने काही दिवसांपूर्वीच इमारतीचे बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. त्याला रहिवाशांनी विरोध करुन बांधकामास मज्जाव केला. या बिल्डरमार्फत ९ ठिकाणच्या मोकळ्या जागेत बांधकामे सुरु करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला असून याविरोधात पालिकेकडे तक्रार करुनही कोणतीही मनाई नसल्याचे सांगण्यात आले आहे. येथील फ्लॅट खरेदीवेळी बिल्डरने मोकळी जागा आरजी (रिक्रीयेशन ग्राऊंड) असल्याचे सांगून ते उद्यान व खेळाच्या मैदानासाठी मोकळे सोडण्यात आल्याचे रहिवाशांना सांगण्यात आले होते. येथील मंजूर नकाशातही मोकळी जागा असल्याचे निदर्शनास येत असताना ती बिल्डरच्या डोळ्यावर आली आहे. सध्या या जागा हडपण्याचा डाव साधण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. मीरारोड येथील शांतीनगर या मोठ्या वसाहतीत मुलांना खेळण्यासाठी असलेल्या जागी बांधकामे झाल्यास त्यांना खेळासाठी एकही मोकळी जागा उपलब्ध होणार नसल्याने त्यांच्या खिलाडू वृत्तीवर गंडातर येणार असल्याची भीती रहिवाशांकडून व्यक्त करण्यात आली आहे. बिल्डरने पालिका अधिकाय््राांशी संगनमत करुनच असा उपद्व्याप चालविल्याचा आरोप करुन त्याचा विरोध करण्यासाठी रहिवाशांनी परिसरात मोर्चा काढला होता. त्यावेळी बिल्डर व पालिकेचा निषेध करण्यात आला. मोकळ्या जागेवरील बांधकाम सुरुच राहिल्यास रहिवाशी न्यायालयात जाणार आहेत.