पावसात चाललेल्यांनी ७२ तासांत औषधोपचार करावा, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 04:37 AM2019-07-04T04:37:28+5:302019-07-04T04:37:44+5:30
अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते.
मुंबई : गेले दोन दिवस शहर उपनगरांत पाऊस झाला. या सारख्या मोठ्या पावसानंतर महापालिका क्षेत्रात लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे यापूर्वीच्या अनुभवावरून दिसून येते. ही बाब लक्षात घेऊन, ज्या व्यक्ती गम बूट वापरण्यासारखी खबरदारी न घेता पावसाच्या पाण्यातून चालत गेल्या होत्या, त्यांना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता असते. तर जखमा, खरचटलेला भाग असलेल्या ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संबंध आला असेल, अशा व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच पावसाच्या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे, असे आवाहन महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केली आहे.
अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाचे सूक्ष्मजंतूचा प्रादुर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या मूत्रातून लेप्टोचे सूक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात संसर्गीत होतात. अशा बाधित झालेल्या पाण्याशी माणसाचा संबंध आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते, तसेच व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल, तरी अशा छोट्याशा जखमेतूनसुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात.
त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असे आवाहन डॉ. केसकर यांनी केले आहे.
घ्यावयाची काळजी
पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यू, मलेरिया अथवा ‘लेप्टोस्पायरोसिस’ असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुऊन कोरडे करावे.
प्रतिबंधात्मक औषधोपचार करा
ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एकदाच चालल्या असून, ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरीराच्या भागावर जखम नसेल, अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने ‘कमी जोखीम’ या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर ‘डॉक्सीसायक्लीन’ (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे एकदा सेवन करावयास सांगावयाचे आहे. गरोदर स्त्रिया व ८ वर्षांखालील बालकांना डॉक्सीसायक्लीन देऊ नये.
लक्षणे : ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्राव इत्यादी या रोगाची लक्षणे आहेत. रुग्णांना श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होणे, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अशी लक्षणेही आढळतात. त्यांना योग्यवेळी औषधोपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका संभवतो.