धोकादायक इमारत रिकामी करण्यास रहिवाशांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 02:06 AM2019-11-12T02:06:13+5:302019-11-12T02:06:16+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गिकेचे काम सुरू असताना माहिम पश्चिम येथील एल.जे. रोडवरील लक्ष्मी या म्हाडाच्या इमारतीला तडे गेले आहेत. ही माहिती मिळताच पालिका अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी करून इमारत खाली करण्याचा निर्णय घेतला. मात्र या इमारतीतील रहिवाशांनी इमारत खाली करण्यास नकार देत धोकादायक इमारतीमध्ये राहणे पसंत केले आहे. मात्र भविष्यात जर दुर्घटना घडली तर जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित होत आहे.
माहिम पश्चिम येथे मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. मेट्रोसाठी वापरण्यात येणाºया यंत्रांमुळे जमिनीला मोठे हादरे बसत आहेत. रविवारी सायंकाळी सातच्या दरम्यान मेट्रो-३ मार्गिकेचे काम सुरू असताना सतत बसणाºया हादऱ्यांमुळे माहिम पश्चिमेकडील एल.जे. मार्गावरील तीन मजली लक्ष्मी इमारतीच्या टेरेसवर आणि इमारतींच्या भिंतींना तडे गेले. यासह इमारतीच्या तळमजल्यावरील चार दुकानांचा पाया थोडा खचल्याचे निदर्शनास आले. यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी इमारतीच्या बाहेर पळ काढत पालिकेच्या विभाग कार्यालयाला या प्रकाराची माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी पोलीस आणि म्हाडाचे वॉर्ड अधिकारीही उपस्थित होते.
तीन मजली इमारतीमध्ये सुमारे तीस कुटुंबीय राहतात. या इमारतीतील रहिवाशांना हॉटेलमध्ये स्थलांतरित करून स्ट्रक्चरल आॅडिट करून दोन दिवसांमध्ये अहवाल देण्यात येणार असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमआरसीएल) सांगण्यात आले आहे.
मात्र या धोकादायक इमारतीमध्ये रहिवासी राहत असल्याचे निदर्शनास आले. तसेच या इमारतीचा विद्युत पुरवठा तोडण्यासाठी गेलेल्या अधिकाºयांनाही रहिवाशांनी विरोध केला. आपण इतर ठिकाणी राहायला गेलो तर पुन्हा इमारतीमध्ये येण्यास खूप वेळ लागेल, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.