मुंबई : आपल्या विविध मागण्या घेऊन शेकडोंच्या संख्येने चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीमधील रहिवाशांनी मंगळवारी वांद्र्याच्या एसआरए कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता.
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली आमच्यावर लादलेला विकासक व फेडरेशन यांना हटवा, विकासकाला दिलेला एलओआय रद्द करा, घरधारकांना विकासक निवडण्याचा अधिकार मिळायला हवा आणि १६ मे २०१८ च्या शासन परिपत्रकानुसार शासकीय सर्व्हे वर्ष २०११ च्या झोपडी अस्तित्वाच्या पुराव्यानुसार पात्रतेचा सर्व्हे करा, या प्रमुख मागण्या या मोर्चेकऱ्यांच्या होत्या.
चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत एकूण साडेतीन हजारपेक्षा जास्त झोपडीधारकांचे वास्तव्य आहे. सिद्धार्थ कॉलनीचा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत विकास करण्याच्या उद्देशाने २००६ साली या ठिकाणी फेडरेशनची स्थापना करण्यात आली.
मात्र मागील पंधरा वर्षांमध्ये विकासक व फेडरेशन यांनी कोणताही विकास न करता रहिवाशांची फसवणूक केली असल्याचा आरोप येथील जनता करीत आहे. त्यात आता रहिवाशांना विश्वासात न घेता येथील पुनर्विकास प्रकल्प एका खासगी विकासकाला सोपविला गेल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. सिद्धार्थ कॉलनीची जागा १६ एकर असून, विकासक तीन एकर जागेत ८ इमारती बांधत आहे. याला रहिवाशांचा विरोध आहे. त्यामुळे एसआरए प्रशासनाचे या समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.