सिद्धार्थ कॉलनीमधील रहिवाशांचा मोर्चा; वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:18 AM2019-08-08T01:18:21+5:302019-08-08T01:18:24+5:30

७७ कोटी रुपयांचे थकीत बिल

Residents of Siddhartha Colony | सिद्धार्थ कॉलनीमधील रहिवाशांचा मोर्चा; वीजपुरवठा खंडित

सिद्धार्थ कॉलनीमधील रहिवाशांचा मोर्चा; वीजपुरवठा खंडित

Next

मुंबई : चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमधील रहिवाशांची १४ वर्षे फसवणूक करणाऱ्या व ७७ कोटींच्या थकीत विजबिलासाठी कारणीभूत असणाºया फेडरेशनमधील व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी सिद्धार्थ कॉलनीमधील रहिवाशांनी मंगळवारी चेंबूरच्या पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. सिद्धार्थ कॉलनी ते चेंबूर पोलीस उपायुक्त कार्यालय यामार्गे मोर्चा काढण्यात आला होता.

मागील वीस दिवसांपासून सिद्धार्थ कॉलनीमध्ये वीज नसल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासन यावर कोणताच तोडगा काढत नसल्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अदानी वीज कंपनीला अनेकदा पत्रव्यवहार करूनदेखील कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. चालू महिन्याचे विजबिल भरण्यासाठी रहिवाशांमध्ये जनजागृती केल्यामुळे आतापर्यंत सोळाशे रहिवाशांनी चालू महिन्याचे वीजबिल भरले आहे. तरीदेखील सिद्धार्थ कॉलनीमध्ये पहाटे ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज खंडित केली जाते. या सर्व समस्यांचे निवेदन चेंबूर पोलीस उपायुक्तांकडे मोर्चातील शिष्टमंडळाने सादर केले. या वेळी उपायुक्तांकडून सांगण्यात आले की सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच अदानी कंपनीला वीजकपातीची वेळ पहाटे ३ ऐवजी सकाळी ६ नंतर करावी, असे सांगण्यात येईल.

सिद्धार्थ कॉलनीमधील रहिवाशांवर थकीत विजबिलाचे ७७ कोटींचे कर्ज झाले आहे. पण हे कर्ज रहिवाशांच्या चुकीमुळे नाही तर विकासक व फेडरेशनच्या चुकीमुळे झाले आहे. त्यामुळे अदानी कंपनी व सरकारकडे विनंती आहे की, आमच्यावरील ७७ कोटींचे कर्ज माफ करावे. चालू महिन्यापासून नियमित वीजबिल भरण्यास आम्ही तयार आहोत.
- राजू घेगडमल (स्थानिक)

केवळ विकासक व फेडरेशन यांच्या चुकीमुळे सिद्धार्थ कॉलनीमधील रहिवाशांवर संकट ओढावले आहे. वीजबिलासंदर्भात तोडगा काढण्यासाठी अदानी कंपनीने आमच्याशी चर्चा करावी.
- भगवान गरुड (स्थानिक)

सिद्धार्थ कॉलनीमधील रहिवाशांवर वारंवार असा आरोप होत आला आहे की येथील रहिवासी वीजबिल भरत नाहीत. परंतु असे नसून रहिवाशांची वीजबिल भरायची इच्छा आहे. तुमचे वीजबिल व पाणीबिल आम्ही भरू, या विकासक व फेडरेशन यांनी १४ वर्षांपूर्वी दिलेल्या खोट्या आश्वासनांमुळे रहिवाशांना अंधारात राहायची वेळ आली आहे.
- सचिन गवारे (स्थानिक)

Web Title: Residents of Siddhartha Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.