मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या झगमगाटाआड गोराई गावात वसलेला आदिवासींचा जामझाड पाडा मात्र अंधारातच होता. मनसेच्या निरंतर पाठपुराव्याने स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर अखेर या पाड्यात वीज पुरवठा झाला आणि पाड्यातील घर अन् घर उजळून निघाले. जणु आपले आयुष्यच उजळून निघाल्याचा आनंद प्रत्येक गावकऱ्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. मनसे शाखाध्यक्ष महेश लक्ष्मण नर यांनी सातत्याने पाठपुरावा आणि निवेदने देऊन अखेरीस या आदिवासी पाड्यावर वीज पोहोचली असल्याचा दावा मनसेने केला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी अमित राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेऊन पक्षाचे आभार मानले तसेच प्रेमाची भेट म्हणून गावात उत्पादन करत असेलेली फळे व भाजीपाला भेट दिला.
भाईंदरच्या उत्तन - गोराई मार्गापासुन सुमारे तीन किमी आत डोंगराच्या खाली वसलेला जामझाड हा ५२ उंबरठ्यांचा आदिवासी पाडा. मुंबईच्या हद्दीत आणि भाईंदरच्या वेशीवर असलेल्या पाड्यात जेमतेम दोनशेची लोकवस्ती आहे. अदानी या वीज कंपनीने जामझाड पाड्यात वायर टाकण्याचे काम सुरू केले होते. ते या आठवड्यात पूर्ण झाले असून, आता हा पाडा प्रकाशाने उजळून निघाला आहे. कित्येक वर्षांपासून आपल्याकडेही वीज येईल, या प्रतीक्षेत गोराई येथील या पाड्यातील नागरिक होते. येथील कुटुंबांना लवकरात लवकर वीजसेवेचा आनंद घेता येईल, याची खातरजमा कंपनीच्या टीमने स्थानिकांच्या मदतीने केली. ३ मे रोजी पहिल्यांदा येथे विजेचा दिवा सुरू झाला, तेव्हा ग्रामस्थांनी एकत्र येत आनंद साजरा केला. येथे वायर टाकण्याचे काम सुरू झाल्यापासून आपली घरेही प्रकाशात उजळून निघण्याची प्रतीक्षा करणारी लहान मुलेही आनंदी होती.
मुंबईच्या गोराई गावातील जामझाड पाडा 71 वर्षांनी उजळला
अदानीकडून सांगण्यात आले की, आम्ही गोराईतील जामझाड पाडा येथील विजेचे काम पूर्ण केले आहे. गावातील कुटुंबांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे आम्ही हे काम पूर्ण करू शकलो. आपली घरे प्रकाशाने उजळलेली पाहताना, या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आलेली झळाळी पाहणे हा अत्यंत समाधानकारक अनुभव होता. दरम्यान, शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर छोट्या डोंगरावर असलेला जामझाड पाडा आता येथे वीज दाखल झाल्याने, शहराच्या अधिक जवळ आला आहे.