वसई : आगरी सेनेच्या पालघर जिल्हाध्यक्षांनी राजकीय पक्षाशी वाटाघाटी केल्यामुळे निराश झालेल्या आगरी सेनेच्या उपाध्यक्षासहीत अन्य सात पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे आगरी सेनाप्रमुख यांना सुपूर्द केल्याने पालघर जिल्ह्यातील राजकीय वातावरण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ढवळून निघणार असल्याचे चित्र जिल्हाभर दिसते आहे.
ठाण्यात काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील आगरी सेनेचा भव्य मेळावा संपन्न झाला होता. आगरी समाजासाठी कामकाज करताना एक आचारसंहिता म्हणून कोणत्याही पक्षाशी राजकीय वाटाघाटी, चर्चा न करण्याचे या मेळाव्यात ठरवले होते. या मेळाव्यानंतर काही दिवसातच बहुजन विकास आघाडीचे आ. विलास तरे यांनी मातोश्री येथे जाऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यावेळी आगरी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील हे आ. तरे यांच्या सोबत होते. तसा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.इतकेच नाही तर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी या पक्षप्रवेशाला समर्थनही दिले. त्यामुळे पाटील यांनी संघटनेच्या आदेशाचे सपशेल उल्लंघन केल्याच्या भावनेने जिल्ह्यातील पदाधिकारी कमालीचे नाराज झाले. पाटील यांनी कोणत्याही पदाधिकाºयांना विश्वासात न घेता हा निर्णय परस्पर घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकाºयांनी पाटील यांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करून आपले राजीनामे आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी दिली.जनार्दन पाटील यांच्या गैर जबाबदार आणि अविश्वासार्ह वर्तनामुळे संघटनेच्या कार्यावर विपरीत परिणाम होणार आहे, याची कल्पना देण्यात आल्या नंतरही जनार्दन पाटील यांनी पदाधिकाºयांच्या मतांना जुमानले नाही. त्यामुळेच राजीनामे देण्यात आल्याचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास पाटील आणि अन्य सात पदाधिकारी वर्गानी स्पष्ट केले.कोण आहेत आगरी सेनेचे सात पदाधिकारी !उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्यासहित मंगेश भोईर, सरचिटणीस आत्माराम पाटील, चेतन गावंड, मोहन पाटील, संघटक सचिन एस.के. आणि सचिन पाटीलराजकीय पक्षाशी वाटाघाटी करायच्या नाहीत असे आगरी सेनेचे धोरण ठरले असताना आ. तरे यांच्या निमित्ताने शिवसेनेला पाठिंबा देण्यासारखा निर्णय पालघर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी परस्पर आणि कुणालाही विश्वासात न घेता घेतला. यामुळे मी स्वत: आणि संघटनेचे ७ पदाधिकारी यांनी राजीनामे दिले आहेत. सर्वांना सोबत घेऊन एकत्रितपणे जाणारे सर्वसमावेशक असे नेतृत्व जिल्ह्याला असावे अशी आमची मागणी आहे. यावर लवकरच निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.- कैलास पाटील, आगरी सेना, पालघर जिल्हा उपाध्यक्ष