जमिनीखाली बुद्धविहार बांधण्यास रहिवाशांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 02:21 AM2019-06-15T02:21:47+5:302019-06-15T02:21:52+5:30
मुंबई : चेंबूर येथील पंचशीलनगरमध्ये एसआरए अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र येथे असलेले दोन बुद्धविहार पुनर्वसन आराखड्यात ...
मुंबई : चेंबूर येथील पंचशीलनगरमध्ये एसआरए अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र येथे असलेले दोन बुद्धविहार पुनर्वसन आराखड्यात जमिनीखाली बांधून देणार असल्याचे विकासकाने म्हटले आहे. परंतु जमिनीखाली बुद्धविहार बांधण्यास पंचशीलनगर येथील रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. जमिनीवरच बुद्धविहार बांधा; अन्यथा आझाद मैदानात आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा रहिवाशांनी पत्रकार परिषदेत दिला. या वेळी अॅड. संतोष सांजकर, अॅड. अजय तापकीर, रामभाऊ शिंदे उपस्थित होते.
याबाबत अॅड. संतोष सांजकर म्हणाले, एसआरएच्या नावाखाली सारनाथ आणि वैशाली बुद्धविहार तोडण्यात आले, नगरविकास व गृह विभागाने कोणताही आराखडा न पाहता बुद्धविहार बांधण्याची परवानगी दिली. यासंदर्भात आम्ही लोकायुक्तांकडे तक्रार केली असता बुद्धविहार बांधकामाची प्रक्रिया ही मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने झाली असल्याने आणि मुख्यमंत्री लोकायुक्ताच्या अधिकार कक्षेत येत नसल्याने कारवाई करता येणार नाही, असे उत्तर देण्यात आले.
या विषयावर रहिवाशांनी नोव्हेंबर २०१८ पासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली. पण २०० दिवस उलटूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. तसेच संपूर्ण मुंबईत एसआरएच्या बुद्धविहारांचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी व त्यासंदर्भात योग्य नियम करण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडण्यात यावा, अशी विनंती त्यांनी आमदारांना केली. यावर योग्य ती कारवाई न झाल्यास आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.