Join us

प्राचीन मंदिर पाडण्यास रहिवाशांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 2:50 AM

मालाड (पूर्व) येथील हाजी बापू रोडवरील नवजीवन एसआरए गृहनिर्माण संस्थेच्या योजनेच्या जागेतील गावदेवीचे प्राचीन मंदिर हटवण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे.

मुंबई : मालाड (पूर्व) येथील हाजी बापू रोडवरील नवजीवन एसआरए गृहनिर्माण संस्थेच्या योजनेच्या जागेतील गावदेवीचे प्राचीन मंदिर हटवण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. ही योजना सुरू करण्याआधीच विकासकाने हे मंदिर आहे त्याच जागेवर बांधून देण्याचे मान्य केले होते. मात्र आता ते हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची नागरिकांची तक्रार आहे.या योजनेत बनावट परिशिष्ट - २ तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे लेखी आदेश उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना दिल्याचे वृत्त अलीकडेच ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.धोबीघाट परिसरात पाच एकर जागेत विकासक शिवशक्ती बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याद्वारे ही एसआरए योजना सुरू आहे. या योजनेला बांधकामासाठी महापालिकेची परवानगीही मिळाली आहे. या जागेत गावदेवीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या देखभालीसाठी १९८१ साली श्री गावदेवी मंदिर जीर्णोद्धार व व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. समितीतर्फे महापालिकेला मालमत्ता करही भरण्यात येतो. हे मंदिर पाडण्यासाठी विकासक उपजिल्हाधिकारी आणि एसआरए कार्यालयात अर्ज करीत असून प्रशासनामार्फत नोटीसही बजावण्यात आली आहे. प्राचीन मंदिर असताना ते अपात्र दर्शवत पाडण्यासाठी सरकारी कार्यालये प्रयत्नशील असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते.या एसआरए प्रकल्पात बनावट कागदपत्रे तयार करण्याचा गंभीर गुन्हा घडला असून त्याची जबाबदारीही संबंधितांनी घेतली आहे. तसेच हे मंदिर पाडण्यात येऊ नये, असे निवेदन राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांसह संबंधितांना दिले आहे.