Join us

रेती उत्खननाला विरोध

By admin | Published: January 01, 2015 11:02 PM

अल्पावधीत करोडो रुपयांची आर्थिक कमाई करण्यासाठी अवैध रेती उत्खननाचा धंदा सध्या जोरात सुरू

पेण : अल्पावधीत करोडो रुपयांची आर्थिक कमाई करण्यासाठी अवैध रेती उत्खननाचा धंदा सध्या जोरात सुरू असून पेणमधील दादर, वशेणी खाडीमध्ये रेतीमाफियांचे सक्शन पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असते. दररोज १५ ते २० सक्शप पंपाद्वारे ४०० ते ५०० ब्रास रेतीचा उपसा करून १५० ब्रास क्षमतेच्या तीन बार्जमध्ये ही चोरटी उपसलेली रेती समुद्रामार्गे बिल्डर लॉबीला मुंबई येथे पोहोचविली जाते. अवैध रेती उत्खननाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेक वेळा अर्ज निवेदने देवूनही रेतीमाफियांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने दादर ग्रामपंचायत, ग्रामस्थ हातपाटी रेती संघटना व ज्ञानदीप संघटनांनी आजपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.पेणचे दादर गाव १९८९ च्या महापुरात समुद्राचे संरक्षक बंधारे फुटून गेल्याने येथील २ हजार ८०० एकर भातशेती पूर्णत: नापीक होवून गावाची रोजीरोटी मत्स्यव्यवसाय व पारंपरिक हातपाटीद्वारे वाळू उपसा यावर चाललेली आहे. गावाच्या चोहीकडे खाड्याचे व समुद्राचे पाणी, त्यामुळे एकप्रकारे बेट तयार झाले आहे. गावची लोकवस्ती १२ हजार असून हातपाटी व्यवसायात २०० ते २५० कुटुंबातील २ हजार ते २ हजार ५०० वाळू उपसा करणारे पारंपरिक गावकरी आहेत. पूर्वी शिडाचे मचवे होते मात्र आता अर्धा ते पाऊण तास क्षमतेच्या होड्यातून ओहोटीच्या वेळी बुडी मारून टोपलीत रेती उपसा करून प्रतिब्रास २ हजार रुपयेप्रमाणे या ग्रामस्थांना १५०० ते १८०० रुपये कमाई होते. सध्या या पारंपरिक व्यवसायावर प्रतिब्रास ६५० रुपये शासनातर्फे रॉयल्टी आकारून रेती उत्खनन परवाना दिला जातो. २५ आॅक्टोबर २०१० रोजी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने १० ब्रास रेती उत्खनन करण्याचा हातपाटी व्यावसायिकांना परवाना संमत केला आहे. त्यायोगे पर्यावरणाची हानी पोहोचू नये हा उद्देश ठेवून परवाना दिला जातो. मात्र याच शासन निर्णयाचे बेकायदेशीर रेती उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. दररोज २० लाख रुपयांचा हा अवैध रेतीचा धंदा सुरू असून वर्षभरात ७० ते ७२ कोटी रुपयांचा महसूल बुडविला जातो. एका दादर वशेणी खाडीतला हा व्यवहार आहे. दुसरीकडे पेणच्या धरमतर, कोलेटी, काळेश्री, भाल या खाड्यांसह नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाकडे महसूल यंत्रणेचा कानाडोळा होत असून शासनाचा महसूल बुडत आहे. दादरच्या ग्रामस्थांचे या विरोधातच आंदोलन असून तब्बल ११० ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू झाले असून ज्ञानदीप संघटनेचे स्वागत पाटील, दादर सरपंच, नरदास पाटील, उपसरपंच अर्चना पाटील, गोरख पाटील, मयुरी पाटील, ज्योत्स्रा पाटील, शीतल घरत, समाधान ठाकूर, प्रियंका नाईक, आदींसह ११० गावकऱ्यांनी उत्खनन थांबविण्याची मागणी केली आहे. च्दादर वशेणी खाडीमध्ये रात्रीच्या वेळेत १८ ते २० सक्शन पंपाद्वारे दररोज ४५० ते ५०० ब्रास रेती उत्खनन केली जाते. त्यानंतर ही रेती २०० ब्रास क्षमतेच्या बार्जमधून आवरा बंदरातून मुंबईकडे पोहोचविली जाते. च्अवैध उत्खननातून ७० ते ७२ कोटी रुपयांचा महसूल बुडविला जातो. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.