Join us

लैंगिक अत्याचाराला प्रतिकार केल्याने हत्या

By admin | Published: March 29, 2016 2:08 AM

लैंगिक अत्याचाराला प्रतिकार केल्याने ५० ते ५५ वर्षीय महिलेची हत्या केल्याचे एमआरए मार्ग पोलिसांनी अटक केलेल्या दुकलीच्या चौकशीतून समोर येत आहे.

मुंबई : लैंगिक अत्याचाराला प्रतिकार केल्याने ५० ते ५५ वर्षीय महिलेची हत्या केल्याचे एमआरए मार्ग पोलिसांनी अटक केलेल्या दुकलीच्या चौकशीतून समोर येत आहे. काहीही पुरावे हाती नसताना एमआरए मार्ग पोलिसांनी शिताफीने आरोपीचा शोध घेत गुन्ह्यांची उकल केली. अविनाश पिंबेळकर (२२), मुकेश मुसागेर (२१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पी. डिमेलो रोड येथे रेल्वे कंपाउंड परिसरात ५० ते ५५ वर्षीय महिलेचा २५ मार्च रोजी मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. महिलेच्या चेहऱ्यावर, जबड्यावर वार करून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुखलाल वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके नेमण्यात आली. महिलेच्या राहणीमानावरून ती फुटपाथवर राहत असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. त्यानुसार तिची ओळख पटविण्यासाठी सीएसटी, फोर्ट, बेलॉर्ड पिअर, आझाद मैदान, पायधुनी, नागपाडा या विभागांतील हमाल, हातगाडी चालक, टेम्पो आणि टॅक्सीचालकांसह चहावाले, सफाई कामगार, गर्दुल्ले अशा तब्बल १४० ते १५० जणांकडे कसून चौकशी सुरू केली. या दरम्यान मृत महिलेचा घटनेच्या १५ दिवसांपूर्वी गर्दुल्ल्यासोबत पैशांच्या मागणीवरून वाद झाल्याची माहिती समोर आली. तसेच घटनेच्या रात्री मृत महिला या दोघांसोबत स्टेशनच्या दिशेने जाताना दिसल्याचेही समजले. या माहितीने पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाल्याने त्यांनी गर्दुल्ल्यांकडे मोर्चा वळविला. त्यानुसार, न्यू सीएसटी रेल्वे फलाट क्रमांक १८ सह पी. डीमेलो रोड, कर्नाक बंदर, मस्जिद बंदर, मेन्शन रोड, संत तुकाराम रोड, वाडीबंदर, रामनगर झोपडपट्टी परिसरात फिरणारे आणि अभिलेखावरील गर्दुल्ले, आरोपींना ताब्यात घेतले. जवळपास १४० ते १५० जणांच्या तपासात अटक दुकली मेन्शन रोड येथील पडक्या गोडाऊनध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने तेथे सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.शवविच्छेदनाच्या अहवालातही तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही नशेखोर असून घर सोडून निघून आलेले आहेत. यातील मुकेश याने बारावीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. दोघांकडेही कसून चौकशी सुरू असल्याचीमाहिती एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी दिली. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही.