'मुंबईतील मतदानाचा टक्का साठीपार नेण्याचा संकल्प'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 01:08 AM2019-09-27T01:08:25+5:302019-09-27T01:08:42+5:30

आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

Resolution to cross voter turnout in Mumbai | 'मुंबईतील मतदानाचा टक्का साठीपार नेण्याचा संकल्प'

'मुंबईतील मतदानाचा टक्का साठीपार नेण्याचा संकल्प'

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील १० मतदारसंघांतील मतदानासाठी यंत्रणा सज्ज आहे. २००९ च्या निवडणुकांत मुंबईत ४३ टक्के तर २०१४ च्या निवडणुकीत ५६ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी साठच्या पुढे नेण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी गुरुवारी सांगितले.

निवडणुकांच्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम, निवडणूक तहसीलदार श्यामसुंदर सुरवसे व प्रशांत सावंत, माध्यम कक्ष समन्वयक राजू पाटोदकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे म्हणाले, निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी करता येणार नाही. आचारसंहिताभंगाच्या तक्रारींवर काम करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजील अ‍ॅपवर आतापर्यंत १७ तक्रारी आल्या. त्यांचे निराकरण करण्यात आले आहे. अशा तक्रारींवर शंभर मिनिटांत कारवाई करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी या वेळी सांगितले.

मतदानाच्या दिवशी अधिकाधिक पात्र लोकांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनाने जनजागृती मोहिमेचे आयोजन केले आहे. मतदानाच्या दिवशी सर्व खासगी आस्थापनांनी सुट्टी जाहीर करावी. अन्यथा, आयोगाची परवानगी घेऊन मतदानासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने दोन तासांची सूट द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांवर रॅम्प, पाणी, फर्निचर, वीज, प्रसाधन गृह, सायनेजेस (फलक), शेड, मदत केंद्र, पाळणाघर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सामाजिक संस्थांनी व्हीलचेअर दिल्या असून जिल्हा विकास निधीतून ४०० नवीन व्हीलचेअर निवडणुकांसाठी खरेदी करण्यात आल्या आहेत. मुंबई जिल्ह्यात केवळ २४५७ दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली आहे. अनेक मतदारांनी आपल्या दिव्यांग स्थितीबाबत निवडणूक आयोगाला माहिती दिलेली नाही. अशीच स्थिती तृतीयपंथी मतदारांच्या बाबतीत आढळल्याचे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले.

निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख : २७ सप्टेंवर
अर्ज भरण्याची अंतिम तारीख - ४ आॅक्टोबर
अर्जांची छाननी - ५ आॅक्टोबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - ७ आॅक्टोबर
मतदानाची तारीख - २१ आॅक्टोबर
मतमोजणी - २४ आॅक्टोबर
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख - २७ आॅक्टोबर

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघ :
धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबारहिल, मुंबादेवी आणि कुलाबा.

मुंबई शहर जिल्हा
मतदारसंघ - १०
एकूण मतदार - २५,०४,७३८
पुरुष मतदार - १३,६८,४८२
महिला मतदार - ११.३५,७७७
तृतीयपंथी - १०८
सर्व्हिस मतदार - ३७१
एकूण मतदान केंद्रे - २५९४

Web Title: Resolution to cross voter turnout in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.