मराठीच्या विकासाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:12 AM2021-02-20T04:12:33+5:302021-02-20T04:12:33+5:30

मराठी भाषा दिवस हा खरे तर आत्मपरीक्षण करण्याचा, भाषा विकासाचा संकल्प करण्याचा, त्याच्या पूर्ततेसाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचा ...

Resolution for the development of Marathi | मराठीच्या विकासाचा संकल्प

मराठीच्या विकासाचा संकल्प

googlenewsNext

मराठी भाषा दिवस हा खरे तर आत्मपरीक्षण करण्याचा, भाषा विकासाचा संकल्प करण्याचा, त्याच्या पूर्ततेसाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचा दिवस आहे. पण त्यासाठी भाषेचा विकास म्हणजे काय, तो कोणी व कसा करायचा असतो याची शास्त्रीय समज असण्याची गरज आहे.

...................................

गेल्या काही वर्षांत मराठी भाषा दिवस, मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्य शासनाच्या मराठी विभागाने केलेल्या आवाहनाला केवळ शासकीय कार्यालयेच नव्हे, तर शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ही गोष्ट चांगली असली तरी त्यामुळे एक भावनिक वातावरण निर्मिती सोडली तर फारसे काही हाती लागत नाही. कारण असे दिवस साजरे करण्यातून मराठी भाषेचे वास्तविक प्रश्न सोडवण्याऐवजी ते झाकून ठेवण्याचीच प्रवृत्ती दिसून येते. ह्या काळात काव्यवाचनाच्या कार्यक्रमांचे एवढे पेव फुटते की, मराठीचे सगळे आलबेल चालले आहे असेच कोणालाही वाटावे.

गेल्या काही वर्षांत मराठी भाषेसमोर काही गंभीर प्रश्न आहेत आणि ते सोडवले गेले पाहिजेत. किमान एवढी तरी जाणीव समाजात निर्माण झालेली आहे. दीड-दोन दशकांपूर्वी तीही अपवादाने होती. जोवर खेड्यापाड्यांतून मराठी भाषा बोलली जात आहे, जोवर मराठीत ज्ञानेश्वर-तुकोबा आहेत तोवर मराठीला मरण नाही, असे सर्रासपणे सांगितले जायचे आणि मराठी भाषेविषयी काळजी करणाऱ्यांची चेष्टा केली जायची. ही परिस्थिती नव्वदीनंतर बदलली. शिक्षणातील इंग्रजीचे प्राबल्य वाढून मराठी शाळांना घरघर लागली तेव्हा मराठीच्या गतवैभवावर भिस्त ठेवून असलेला एक मोठा वर्ग भानावर आला. कारण मराठी शाळा ह्या मराठी भाषेची मुळे आहेत. मराठीचा पाया आहेत. तोच खचला तर कालांतराने भाषेची इमारतही खचणार हे उघड आहे. ह्या जाणिवेमुळेच कदाचित राज्य शासनही मराठी भाषा दिन, भाषा पंधरवडा साजरा करण्यात पुढाकार घेत आहे. पण त्याचे आणखी एका सार्वजनिक उत्सवात रूपांतर होण्यापूर्वी त्याला मराठीच्या विकास कार्यक्रमाचे स्वरूप देण्याची गरज आहे.

कोणतीही भाषा स्वयंभू नसते. म्हणजे तिचा उद्गम व विकास आपोआप होत नाही. तो करावा लागतो. भाषेचे अस्तित्व शेवटी तिच्या वापरातून सिद्ध होते. भाषा वापरा, अन्यथा गमवा हे साधे सूत्र आहे. ज्या भाषेचा वापर समाजाच्या सर्व व्यवहारक्षेत्रांत गुणवत्तापूर्ण रीतीने होतो ती प्रगत भाषा आणि तसा होत नाही ती मागासलेली किंवा उपेक्षित भाषा होय. शास्त्रीयदृष्ट्या पाहता कोणतीही भाषा स्वतःहून प्रगत किंवा मागासलेली नसते. समाजाच्या भाषिक गरजा भागवण्याची अभिव्यक्तिक्षमता सर्वच भाषांमध्ये समान असते; परंतु भाषेची ही अंगभूत क्षमता विविध सामाजिक, राजकीय कारणांमुळे कमी-अधिक प्रमाणात वापरली जाते किंवा अजिबात वापरली जात नाही. एका अर्थाने भाषेची प्रगती-अप्रगती संबंधित भाषकांच्या इच्छाशक्तीवर व भाषिक क्षमतेवर अवलंबून असते आणि इच्छाशक्तीवर प्रभाव टाकणारे अनेक सामाजिक, राजकीय घटक असतात. मराठी भाषेच्या स्थितिगतीचा विचार करताना मराठी समाजाच्या भाषिक अभिवृत्तीचा विचारही अपरिहार्य ठरतो.

भाषिक समाज म्हणून मराठी समाज आज एका द्विधा मनोवस्थेत आहे. एका पेचात सापडलेला आहे. मराठी समाजासमोर असलेला हा पेच सांस्कृतिक आणि आर्थिक हितसंबंधांमधील अंतर्विरोधाचा आहे. मराठीच्या प्रेमाची आर्थिक किंमत मोजण्याऐवजी आर्थिक संधी देणाऱ्या इंग्रजीला जवळ करून तो सांस्कृतिक किंमत मोजतो आहे. हे असे घडते याचे कारण प्रगत व्यवहारक्षेत्रांत मराठीच्या वापराबाबत राज्याला लिखित असे भाषाधोरण नाही. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या व्यवहारक्षेत्रात भाषानिवडीचे स्वातंत्र्य दिल्यानंतर कोणतीही व्यक्ती प्राधान्याने आर्थिक निकष लावून भाषेची निवड करणार हे उघड आहे. मराठी ही इंग्रजीप्रमाणे आर्थिक संधी देणारी भाषा असती तर तिलाही प्राधान्य मिळाले असते. पण गेल्या सहा दशकांमध्ये मराठीचा भावनिक, सांस्कृतिक अंगांनीच आपण अधिक विचार केला आणि समाजाच्या भौतिक प्रगतीची माध्यमभाषा म्हणून तिच्या जडणघडणीकडे दुर्लक्ष केले. ज्या घरात वीज नाही, पाणी नाही त्या घरांत ते स्वतःचे असले तरी कोण आणि किती काळ राहाणार? मराठी भाषेला समाजाच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी सक्षम करण्यात आपण अक्षम्य चालढकल केली. राजकीय इच्छाशक्ती तर नव्हतीच, पण सामाजिक इच्छाशक्तीही कमी पडली. मराठीच्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या आंदोलनांकडे आणि आक्रोशाकडे संकुचित, प्रांतवादी म्हणून दुर्लक्ष केले. मराठीचा वापर होत नाही म्हणून सामुदायिक अरण्यरुदन करीत राहिलो. अलीकडे हे अरण्यरुदन थांबवून भाषा दिन साजरा करण्याच्या प्रतीकात्मक मार्गांचा अवलंब आपण केला आहे.

आता गरज आहे ती मराठीच्या विकासाच्या संकल्पाची व जमिनीवरच्या कालबद्ध कृती कार्यक्रमाची !

- डॉ. प्रकाश परब

Web Title: Resolution for the development of Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.