Join us  

२०० पोलिसांचा अवयवदानाचा संकल्प

By admin | Published: May 14, 2016 2:38 AM

आॅन ड्युटी २४ तास देशसेवेत कार्यरत असणाऱ्या पोलिसांनी मृत्यूनंतरही जनतेची सेवा घडावी म्हणून अवयवदानाचा संकल्प केला आहे

मुंबई : आॅन ड्युटी २४ तास देशसेवेत कार्यरत असणाऱ्या पोलिसांनी मृत्यूनंतरही जनतेची सेवा घडावी म्हणून अवयवदानाचा संकल्प केला आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या उपस्थितीत परिमंडळ ७मधील तब्बल २०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी शुक्रवारी घाटकोपर पोलीस ठाण्यास भेट दिली. या वेळी पोलीस ठाण्यातील अंमलदारांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्याचबरोबर पडसलगीकर यांनी थेट जनतेशी संवाद साधला. घाटकोपर परीसरातील सर्व क्षेत्रातील मंडळींनी या वेळी आवर्जून हजेरी लावली होती. पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड आणि घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक व्यंकटेश पाटील यांच्या संकल्पनेतून अधिकारी वर्गाने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. मृत्यूनंतरही जनतेच्या सेवेसाठी कामी यावे म्हणून अवयवदानाचा संकल्प केला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पडसलगीकर यांच्या उपस्थितीत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, पार्क साईट आणि घाटकोपर पोलीस ठाण्यातील तब्बल २०० अधिकाऱ्यांनी अवयवदान करण्यासाठीचे अर्ज भरले आहेत. हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी सायन रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)