मुंबई : बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणीबाबत सरकारकडून एका महिन्यात धोरण ठरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापूर्वी गृहनिर्माणमंत्री आणि राज्यमंत्र्यांनीही पुनर्बांधणीबाबत वेगवेगळ्या घोषणा केल्या. राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नसल्याने बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणीबाबत रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणीत रहिवाशांना किती चौ. फूट क्षेत्रफळाची घरे मिळणार हेही अद्याप निश्चित झालेले नाही. त्याचप्रमाणे बीडीडी चाळींमध्ये विविध जाती-धर्मांचे लोक राहतात. त्यांनी प्रार्थनास्थळे उभारली आहेत. त्याबाबतही निश्चित धोरण ठरविण्यात आलेले नाही. वरळी हा अतिसंवेदनशील विभाग असल्याने सरकारने याचीही दखल घ्यावी, अशी अपेक्षा अखिल बीडीडी चाळ स्टॉलधारक संघटनेने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे बीडीडी चाळ परिसरात ७00 अधिकृत स्टॉल व ३५६ अधिकृत झोपड्या गेली ३५ वर्षे अस्तित्वात आहेत. त्यांना पुनर्बांधणीत समाविष्ट करणार किंवा नाही हेही धोरण ठरलेले नाही. तरी राज्य सरकारने रहिवासी संघटना, झोपडपट्टी संघटना, स्टॉलधारक संघटना यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून सर्वसमावेशक धोरण ठरवावे, अशी अपेक्षा संघाचे खजिनदार भूषण शेट्ये यांनी व्यक्त केली आहे.
पुनर्बांधणीबाबत बीडीडी चाळ रहिवाशांमध्ये संभ्रम
By admin | Published: February 21, 2016 2:21 AM