कल्याणला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा ‘संकल्प’
By admin | Published: September 13, 2016 03:10 AM2016-09-13T03:10:18+5:302016-09-13T03:10:18+5:30
गणेशोत्सव साजरा करताना सामाजिकता, नैसर्गिकता आणि स्वच्छता ही त्रिसुत्री जोपासली जावी, यासाठी तरुण एकवटले आहेत
जान्हवी मोर्ये, कल्याण
गणेशोत्सव साजरा करताना सामाजिकता, नैसर्गिकता आणि स्वच्छता ही त्रिसुत्री जोपासली जावी, यासाठी तरुण एकवटले आहेत. ‘साई कला अकादमी सामाजिक संस्था’ व ‘नेकस्ट लेव्हल इव्हेंट’तर्फे ‘संकल्पना-२०१६’ हा उपक्रम राबवला जात आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, हाच उद्देश समाजापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
‘संकल्पना २०१६’चे प्रमुख कार्यकर्ते मंगेश आव्हाड यांनी सांगितले की, साई कला अकादमी ही शहापूरमधील सामाजिक संस्था आहे. शहापूरमध्ये ही संस्था तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. यंदापासून तो कल्याणमध्ये प्रथमच राबवण्यात येत आहे. या उपक्रमात कल्याणमधील १५ कार्यकर्ते सहभागी झाले असून, त्याला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे ते समाधानी आहेत.
सामाजिकता, नैसर्गिकता आणि स्वच्छता ही त्रिसुत्री जोपासणाऱ्या घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ते प्रोत्साहन देत आहेत. या उपक्रमाला प्रतिसाद मिळावा, यासाठी त्यांनी स्पर्धा घेतली आहे. गुरुवारपासून त्याच्या पाहणीस सुरुवात झाली आहे. ‘संकल्पना २०१६’ उपक्रमात आतापर्यंत बिर्ला महाविद्यालय, कोनगाव येथील प्रेम आॅटो व लाल चौकीतील एक असे तीन घरगुती गणपती तसेच कल्याणमधील १९ सार्वजनिक मंडळे सहभागी झाली आहेत. शहापूरमध्ये याच तरुणांनी पर्यावरणपूरक ५० गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या होत्या. त्यापैकी ४९ मूर्ती गणेशभक्तांनी खरेदी करून पर्यावरणाला हातभार लावला. शहापुरात त्यांना ९९ टक्के प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमांतर्गत घेतलेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी, १५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणार आहे.