डोंबिवलीतील समस्या सोडवू
By Admin | Published: March 22, 2015 01:40 AM2015-03-22T01:40:18+5:302015-03-22T01:40:18+5:30
केंद्र शासनाच्या विविध उपक्रमांपैकी जेथे ५० टक्क्यांहून अधिक नागरी वस्ती आहे, त्या ठिकाणी विशिष्ट निधीतून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
डोंबिवली : केंद्र शासनाच्या विविध उपक्रमांपैकी जेथे ५० टक्क्यांहून अधिक नागरी वस्ती आहे, त्या ठिकाणी विशिष्ट निधीतून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या समावेशासाठी प्रयत्न करू, त्याचप्रमाणे शहराच्या समस्या येत्या तीन महिन्यांत मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देत कल्याण-डोंबिवलीकरांचा पाडवा गोड केला़
गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या सतराव्या स्वागतयात्रेला प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. राज्यभर या दिनाचे महत्त्व अबालवृद्धांना पटवून आपली संस्कृती, परंपरा यांचे महत्त्व या स्वागत यात्रांच्या माध्यमातून जपले जाते. या विशेष उपक्रमाचा शुभारंभ डोंबिवलीकरांनीच केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. ते म्हणाले, र् वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या २७ गावांबाबतचा धोरणात्मक निर्णय झाला असून, तो जनहितार्थच असेल, या वेळी गणेश मंदिर संस्थानचे विश्वस्त राहुल दामले, महापौर कल्याणी पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, सुभाष भोईर, शोभायात्रा संयोजन समितीच्या प्रमुख दीपाली काळे, कुलकर्णी आदी उपस्थित होते.
येथील गणेश मंदिर संस्थानच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेताना राज्यावर संकटे भरपूर असून, ती पेलून त्यावर मात करून उपाययोजना करण्याचे सामर्थ्य-शक्ती दे, असे साकडे घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळ, अवकाळी पावसाचे संकट याकडे लक्ष वेधत डोंबिवलीत येताना आमदार रवींद्र चव्हाण यांच्याशी तीन तासांहून अधिक काळ झालेल्या चर्चेत येथील नागरिकांच्या गैरसोयी, त्यांच्या अपेक्षा आदी समजून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.