लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टर थकबाकी आणि पगारवाढीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत; कारण पालिकेकडून निवासी डॉक्टरांना देण्यात येणारा रुपये १०००० कोविड भत्ता हीच पगारवाढ असल्याचे म्हणत ११ महिन्यांची थकबाकी नामंजूर केली आहे. यावर निवासी डॉक्टरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता निवासी डॉक्टरांच्या या प्रलंबित मागण्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटनुसार, पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी निवासी डॉक्टर यांच्या समस्यांवर चर्चा केली. त्यावर तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, या आठवड्यात डॉक्टरांची थकबाकी देण्यात येईल, अशीही माहिती दिली आहे.
काय आहे प्रकरण
येत्या सात दिवसांत थकबाकी न देण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर जातील, असा इशाराही पालिका मार्ड संघटनेने दिला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या हाहाकारात जर हे डॉक्टर रजेवर गेले तर मुंबईतील आरोग्य यंत्रणा कोलमडेल, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. या काळात डॉक्टरांच्या सेवेची दखल घेत पालिकेने प्रोत्साहन म्हणून पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसह कोविडसाठी काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांना दहा हजार रुपये भत्ता लागू केला. त्याच दरम्यान मे २०२० मध्ये सरकारी निवासी डॉक्टरांचा पगार अर्थात विद्यावेतन एक हजार रुपयांनी वाढवले तरी पालिका रुग्णालयातील ३००० डॉक्टरांना दहा हजार रुपयांची पगारवाढ मिळालेली नाही. ही थकबाकी लवकरात लवकर मिळावी, अशी या डॉक्टरांची मागणी आहे.