येणारी आषाढी वारी धूरमुक्त करण्याचा संकल्प, आनंद मंत्रालय स्थापन करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 05:52 AM2019-11-09T05:52:58+5:302019-11-09T05:53:20+5:30
चंद्रकांत पाटील : विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न, आनंद मंत्रालय स्थापन करणार
सतीश बागल
पंढरपूर (जि़सोलापूर) : गेल्या तीन वर्षांपासून निर्मलवारी उपक्रम राबविण्यात येत आहे. येणारी आषाढी वारी ही धूरमुक्त वारी करण्याचा संकल्प असून, यासाठी पालखी तळाच्या ठिकाणी मोफत गॅस शेगड्या आणि गॅस सिलेंडर देण्यात येतील. तसेच येणाऱ्या काळात आनंद नावाचे मंत्रालय निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी सुनील महादेव ओमासे आणि नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, ऋतूचक्र बदलले आहे. याचा फटका शेतीला बसत आहे. शेतात पीक नीट आले नाही, शेतमालाला भाव मिळाला नाही की अडचणीत भर पडते. राज्यात सुरुवातीला दुष्काळस्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासनाने उपाययोजना केल्या आहेत. यासाठी केंद्र सरकारकडेही मदत मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.
बेडग (मिरज) येथील ओमासे ठरले मानाचे वारकरी
यंदाच्या कार्तिकी एकादशीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत महापूजा करण्याचा मान बेडग (ता. मिरज ) येथील सुनील ओमासे यांना मिळाला. शेतकरी कुटुंबातील ओमासे २००३ पासून वारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना चांदीची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना मोफत एसटी पासही यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.