कांदिवली समर्थनगरच्या समस्या तातडीने सोडवा; अतुल भातखळकर यांच्या एसआरएला सूचना
By मनोहर कुंभेजकर | Published: February 8, 2024 01:03 PM2024-02-08T13:03:18+5:302024-02-08T13:03:38+5:30
सर्व समस्यांचा निपटारा करण्याचे एसआरए सचिव संदीप देशमुख यांचे आश्वासन
मुंबई: कांदिवली (पूर्व) हनुमान नगर येथील समर्थ नगर एसआरए प्रकल्पातील रहिवाशांना गेल्या काही वर्षापासून पासून विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ते समस्यांच्या दृष्ट चक्रात अडकले आहेत.या समस्यांचा निपटारा करण्यासाठी बुधवारी एसआरए सचिव संदीप देशमुख यांच्या बांद्रा एसआरए येथील कार्यालयाच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत सर्व समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना कांदिवली पूर्वचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिल्या. तर देशमुख यांनी समर्थनगर मधील सर्व समस्यांचा निपटारा तातडीने करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले .
यावेळी शिष्टमंडळाने गेल्या अनेक वर्षापासून विकासक रहिवाशांना कशाप्रकारे त्रास देत आहे. याचा पाढा वाचला. थकीत भाडे, एचटीपी प्लांट, परिसरातील अस्वच्छता, बंद असलेल्या लिफ्ट, आपात्र झोपडीधारकांचे प्रश्न,अशा विविध समस्यावर भातखळकर यांच्या सूचनेवरून अधिकाऱ्यांनी दखल घेत या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
विकासकाला तातडीने बोलावून ज्या समस्या आहेत. त्या लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशा सूचना भातखळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अधिकाऱ्यांनी देखील रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे देशमुख यांनी सांगत तशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. थकीत भाडे मिळत नसल्याने अनेक लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंबंधी भातखळकर यांनी सर्व थकीत भाड्याची यादी द्यावी. ती मी मुख्याधिकाऱ्यांना देऊन या थकित भाड्याचा प्रश्न मी मार्गी लावतो असे सांगितले. शिष्टमंडळातील अनेकांनी ४०६ रहिवाशांना येत असलेल्या समस्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाला अवगत केले.
या शिष्टमंडळामध्ये अध्यक्ष गोविंद पवार, राष्ट्रवादीचे मुंबई संघटक प्रकाश चव्हाण,कांदिवली तालुका अध्यक्ष विष्णू पवार, माजी शाखाप्रमुख पांडुरंग पवार, संस्था क्रमांक १४ चे अध्यक्ष प्यारेलाल यादव,ज्येष्ठ पत्रकार जयवंत बामणे,मनसेचे बाळकृष्ण पालकर, रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते हरीश मृतराज,संस्था क्रमांक १३ चे गणपत सुर्वे, उमेश सिंग ठाकूर ,तसेच ज्ञानभूषण त्रिपाठी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.आमदार भातखळकर यांनी वेळोवेळी संस्थेच्या समस्या सोडविण्यासाठी मदत केल्याने रहिवाशांनी त्यांचे आभार मानले.