बुडालेल्या पर्यटन उद्योगाला रिसाॅर्टचा टेकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:07 AM2020-12-22T04:07:07+5:302020-12-22T04:07:07+5:30
बुडालेल्या पर्यटन उद्योगाला रिसाॅर्टचा टेकू कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीचा कडक लाॅकडाऊन आणि अनलाॅक काळातील साशंकतेने पर्यटन व्यवसायाला जबरदस्त तडाखा ...
बुडालेल्या पर्यटन उद्योगाला रिसाॅर्टचा टेकू
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीचा कडक लाॅकडाऊन आणि अनलाॅक काळातील साशंकतेने पर्यटन व्यवसायाला जबरदस्त तडाखा बसला. एक-एक बाब खुली होत असतानाच, ब्रिटनमधील संसर्गामुळे रुळावर येऊ पाहणाऱ्या पर्यटन उद्योगाला नवा झटका बसला आहे. लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून परदेशी पर्यटन जवळपास ठप्प आहे. देशांतर्गत पर्यटनाचा मोसमही वाया गेला. सणावाराच्या निमित्ताने होणारे धार्मिक पर्यटन अजूनही बहाल झालेले नाही. राज्यातील अजंठा-वेरूळसारखी संरक्षित पर्यटनस्थळे अद्याप बंद असल्याने संलग्न व्यवहार अक्षरशः ठप्प आहेत. पर्यटन उद्योगाशी निगडित सर्वच आघाड्यांवर फटका बसला. ऑगस्टनंतर एक-दोन दिवसांच्या छोट्या पिकनिकचा जोर वाढला. जोडीला हौशी आणि व्यावसायिक ट्रेकर्सही बाहेर पडू लागल्याने डोंगरमाथा, गडकिल्ल्यांच्या भोवती असलेले अर्थकारण सुरू व्हायला थोडी-फार मदत झाली.
सरकारी पातळीवर...
आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात आला. कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले. याशिवाय कोकणाला लाभकारी ठरणारे बीच शँक धोरण जाहीर करण्यात आले. गुहागर, आरेवारे, कुणकेश्वर, तारकर्ली, वर्सोली, दिवेआगार, केळवा आणि बोर्डो येथे पथदर्शी प्रकल्प म्हणून बीच शँक उभारण्यात आले. सोबतच साहसी पर्यटन आणि कॅराॅव्हॅन पर्यटन धोरणावर काम सुरू आहे.
नाइट लाइफ सुरू झाले पण...
मुंबईत बिगरनिवासी क्षेत्रात नाइट लाइफला परवानगी देण्यात आली. एमटीडीसीने ‘मोटोहोम कॅम्परव्हॅन’ आणत भारतीय पर्यटनात नवे दालन उघड केले आहे.
......