रिसॉर्टची सहल विद्यार्थीनीच्या जीवावर...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 09:53 PM2018-12-17T21:53:55+5:302018-12-17T21:54:22+5:30
फातिमादेवी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थीनी सहली दरम्यान जखमी
मुंबई - शालेय सहली अनेकदा एखाद्या रिसॉर्ट अथवा तत्सम मनोरंजन पार्कात नेण्याकडे शाळांचा कल वाढू लागला आहे. मात्र यातूनच काही दुर्दैवी घटना समोर येतात. अशीच एक घटना मालाड पूर्वेच्या फातिमादेवी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थीनीसोबत घडली आहे. शाळेची सहल ग्रेट एस्केपला गेलेली असताना भूमी गेडिया हीच अपघात झाला असून तिला जबर जखमा झाल्या असून ४ टाके पडले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बीच , रिसॉर्टच्या सहलींमुळे पालकांच्या खिशाला कात्री लागते ती वेगळीच पण विद्यार्थ्यांच्या जीवावरच या सहली बेतत असल्याने यावर गंभीर कार्यवाही करणयाची आवश्यकता असल्याचा सूर पालक - शिक्षणतज्ञ यांच्यातून उमटत आहे.
मालाड पूर्व येथील फातिमादेवी इंग्लिश स्कुलची पिकनिक १४ डिसेंबर रोजी ग्रेट एस्केप येथे काढण्यात आली. राइड्स दरम्यान दहावीतील भूमीचा हात सुटला आणि ती खाली पडली. तिला जखम होऊनही शाळेतील शिक्षकांनी केवळ प्राथमिक उपचार केले आणि रात्री इतर विद्यार्थ्यांसोबत घरी पाठविले. भूमीला चहर टाके पडले असून तिला घरी आल्यावर चालण्यासही जमत नव्हते. अशी परिस्थिती असताना एखाद्या शिक्षकांसोबत भूमीला घरी पाठवायला हवे होते अशे सांगत तीव्र शब्दांत शाळा व्यवस्थापनाची टीका भूमीच्या आई सोनल गेडिया यांनी केली. मुळात रिसॉर्ट , बीच या शैक्षणिक सहली नसून त्यावर शिक्षण विभागाने कार्यवाही केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान शाळा अशा सहली काढताना कोणत्याही प्रकारची परवानगी पालकांकडून घेत नाहीत तसेच पालक प्रतिनिधींनाही विचारात घेत नसल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान शाळा प्रशासनाशी याबाबतीत कोणताही संपर्क होऊ शकला नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ५०० रुपयांपासून सुरू होणारे पॅकेज रिसॉर्टच्या दर्जानुसार वाढत जातात. त्यातही अमूक संख्येने विद्यार्थी असतील तर शिक्षक, कर्मचाऱ्यांचा (कधीकधी सहकुटुंबही) खर्च मोफत अशा प्रकरची प्रलोभने दाखवली जातात. या प्रकारांमुळे यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वात भर टाकण्याच्या दृष्टीने आखल्या गेलेल्या शैक्षणिक सहली, या उद्देशालाच हरताळ फासला जातो, अशी खंत एका शिक्षकाने नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे. त्यामुळे रिसॉर्ट आणि बीचवर काढण्यात येणाऱ्या सहलींवर बंदी आणण्याची मागणी पालक वर्गातून जोर धरू लागली आहे.