कोरोना आणीबाणीतही लोकशाहीचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 06:14 PM2020-04-25T18:14:36+5:302020-04-25T18:15:14+5:30
जपानमध्ये नागरीकांचे स्वातंत्र्य अबाधित : स्वयंशिस्तीने सोशल डिस्टंसिंगचे पालन
संदीप शिंदे
मुंबई – कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी जपान सरकारने आणीबाणी जाहीर केली. मात्र, नागरीकांवर कोणतेही निर्बंध लादले नाहीत. इथे नागरीकांच्या स्वातंत्र्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. सरकार लोकांना विनंती करू शकते. सक्तीचे अधिकार त्यांना नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, माँल, बाजारपेठा, हाँटेल नेहमीप्रमाणे सुरू आहेत. सरकार रोज सकाळी ९ आणि दुपारी ३ वाजता देशभरात उद्घोषणा करून लोकांना विनंती करते. त्याचा आदर करत आणि स्वयंशिस्तीने कोरोनाला रोखण्याचे काटोकर प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती जपानमध्ये वास्तव्याला असलेले आणि मुळचे ठाणेकर असलेल्या शैलेंद्र शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
चीनला जपानी संस्कृती आणि तिथल्या ठिकाणांबद्दल खूप अप्रूप आहे. त्यामुळे जपानमध्ये येणा-या परदेशी पाहुण्यांपैकी ६० टक्के चीनचे नागरीक असतात. त्यानंतरही जपानमध्ये हा आजार नियंत्रणात आहे. आजच्या घडीला १२ हजार ८२९ जण बाधित असून ३४५ जणांना मृत्यू झाला आहे. डायमण्ड प्रिंसेस क्रुझमुळे जपानमध्ये या रोगाचा शिरकाव झाला. सुरवातीला सरकारने गंभीर नव्हते. परंतु, प्रादुर्भाव वाढल्यानंतर आरोग्य सेवांचे सक्षमिकरण आणि तपासण्यांचे प्रमाणही वाढले. आता मात्र वाढत्या रुग्णांचा ताण आरोग्य व्यवस्थेला असह्य होत आहे. कुणालाही स्वतःहून तपासणी करता येत नाही. लक्षणे आढळली तर डाँक्टरांच्या सल्ल्यानेच ती होते. सरकारने विनंती केल्यानंतर फूड कोर्ट बंद झाली आहेत. माँल रात्री १० ऐवजी ७ वाजता बंद होतात. पहाटे पाच पर्यंत चालणारे पब (इझाकाया) रात्री ८ वाजता बंद होतात. कार्यालयीन वेळेनंतरच्या पार्ट्या आणि जेवणावळी लोकांनीच बंद केल्या आहेत.
देशात सॅनिटायझर्स आणि मास्कचा वापर वाढल्याने त्याचा प्रचंड तुटवडा आहे. एका व्यक्तीला एका वेळी एकच सॅनिटायझर विकत घेता येतो. तर, मास्कसाठी आधी बुकिंग करावे लागते. त्याच्या किंमतीसुध्दा चौपट झाल्या आहेत. हायर आणि फायर कल्चर नसल्याने कुणालाही कामावरून काढले जात नाही. काही ठिकाणी वेतन कपात झाली आहे. तर, बेरोजगारांना एम्लाँयमेंट इन्शुरन्सअंतर्गत सहा महिने अर्थसहाय्याची तरतूद आहे. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी जपान सरकार आपल्या प्रत्येक नागरीकाला एक लाख येन (७१ हजार रुपये) देणार असल्याचेही शैलेंद्र यांनी सांगितले.
----------------------------------
संस्कृतीतला फरक पथ्यावर
पाश्चिमात्य देश आणि जपानच्या संस्कृतीत मोठा फरक आहे. इथे एकमेकांना भेटल्यानंतर हात मिळविणे किंवा गालाला गाल लावले जात नाही. विशिष्ट अंतरावरून वाकून बो केले जाते. त्यामुळे सोशल डिस्टिंसिंग कायम पाळले जाते. इथली ३० टक्के जनता कायम मास्कचा वापर करते. कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायर्झसर्चा वापर नित्याचा आहे. जेवणाच्या चाँपस्टीक एकदाच वापरल्या जातात. या संकटाच्या काळात ही संस्कृती पथ्यावर पडल्याचे शैलेंद्र नमुद करतात.
----------------------------------
आँलम्पीकचा आर्थिक भुर्दंड
जपानमध्ये आँलम्पीक स्पर्धांची जय्यत तयारी सुरू होती. परंतु, स्पर्धाच रद्द झाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. ही स्पर्धा रद्द होण्यापूर्वी जपानमधील रुग्णांची संख्या कमी होती. ती नंतर अचानक वाढली. स्पर्धा रद्द होऊ नये म्हणून हा आकड्यांचा खेळ झाला नव्हता ना अशी अनेकांची शंका आहे. .
----------------------------------
हंको मुळे कार्यालयाच्या वा-या
जपानने आपल्या कामकाजात प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केला असता तरी आजही तिथे कामाच्या प्रत्येक टप्प्यावरील कागदपत्रांवर संबंधित कर्मचारी किंवा अधिका-याचा स्टॅम्प (हंको) असावा लागतो. त्यामुळे आजही ५९ टक्के कर्मचारी कार्यालयांमध्ये जात आहेत. ग्राहक हा देवासमान आहे. आपल्याला त्रास झाला तरी त्याला त्रास होता कामा नये या जपानी माणसाच्या प्रवृत्तीचा तो परिणाम असेल असे शैलेंद्र शिंदे यांनी सांगितले.