मुंबई : डॉक्टरांवरील वाढते हल्ले रोखणे, त्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘रिस्पेक्ट द डॉक्टर्स’ मोहीम सुरू करण्यात येत आहे. दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी रविवारी चेंबूर येथे ‘नॅशनल डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली.दरवर्षी १ जुलै हा दिवस देशभरात नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने चेंबूर येथे ‘डायलॉग विथ डॉक्टर्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेवाळे यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले, केईम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देशमुख, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे, बेस्ट कमिटी चेअरमन अनिल पाटणकर, नगरसेविका आशा मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. सरकारी रुग्णालये, पालिका रुग्णालये आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टरी पेशातील समस्या, सरकार दरबारी मांडायच्या सूचना अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.‘रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजकार्य करणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ह्यरिस्पेक्ट द डॉक्टर्सह्ण मोहिमेच्या माध्यमातून डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध आम्ही करतो आहोत. तसेच या गंभीर विषयाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करणार आहोत, या शब्दांत खासदार राहुल शेवाळे यांनी आपली भूमिका मांडली. तसेच आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासाठी आपल्या सूचना देण्याचे आवाहनही शेवाळे यांनी डॉक्टरांना केले. या वेळी उपस्थित मान्यवरांचे संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले.
डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी ‘रिस्पेक्ट द डॉक्टर्स’ मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 3:08 AM