Join us

डॉ.आंबेडकरांच्या सहकाऱ्यांच्या वारसांचा सन्मान

By admin | Published: May 04, 2017 6:26 AM

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून मालाडमध्ये

मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून मालाडमध्ये राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीतर्फे डॉ.आंबेडकर यांच्या सहकाऱ्यांच्या वारसांच्या सत्कार-सन्मान रंगणार आहे. या कार्यक्रमांची संकल्पना आखलेल्या डॉ.विजय कदम यांनी ही माहिती दिली.राज्यात प्रथमच असा आगळा वेगळा कार्यक्रम मालाड पश्चिम येथील निधीवन ग्राऊंड, पवन बाग, चिंचोली बंदर याठिकाणी शुक्रवारी ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या वेळी कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांना सहकार्य लाभलेल्या ना.म जोशी, दादासाहेब दोंदे, राव बहादूर केशवराव बोले, देवराव नाईक, सुरबानाना टिपणीस, भाई अनंत चित्रे, शां. शं. रेगे, बाबुजी कवळी, श्रीधरपंत टिळक, नाना पाटील, सीताराम जोशी, दत्तात्रय प्रधान, अनंत काणेकर, फत्तेलाल खान, दगडूशेठ भिलारे, चंद्रकांत अधिकारी, विनायक गणपत राव, बाळ साठे, केळुस्कर गुरूजी, केशव सीताराम ठाकरे, तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज, हैद्राबादचे निजाम अशा विविध जाती-धर्मातील मान्यवर नेत्यांच्या वारसांचा सत्कार होणार आहे. या दिग्गजांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची महती ऐकण्याची संधीदेखील मिळणार आहे. या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमासाठी सुनील मोहिते, विजय जाधव यांचे सहकार्य मिळत आहे. (प्रतिनिधी)