मुंबई : स्वत:चे घर हे सर्व अंधांसाठी खुले करून त्यांना प्रशिक्षण देणारी महिला, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्यासाठी बँक उघडणारी प्रेरणादायी महिला, औषधोपचार न मिळाल्याने जीव जाऊ नये म्हणून रुग्णालय उभारणारी लढवय्या स्त्री, गलेलठ्ठ पगारावर पाणी सोडून तरुणांना मार्गदर्शन करणारे तरुण आणि महिलांना सुरक्षारक्षक क्षेत्रात आणणारी महिला. नेहमीचीवाट सोडून वेगळ्या मार्गाने जाणाऱ्या समाजातील या व्यक्तींना आज ताज हॉटेलमध्ये सन्मानित करण्यात आले. पुण्याच्या मीरा बडवे, साताऱ्याच्या चेतना सिन्हा, पश्चिम बंगालच्या सुभासिनी मिस्त्री, मुंबई आणि दिल्लीच्या अक्षय सक्सेना आणि कृष्णा राजकुमार, हुबळीच्या श्रावणी पवार या पाच व्यक्तींना टाटा सॉल्टच्या ‘मैंने देश का नमक खाया है’ या कॅम्पेनअंतर्गत प्रियांका चोप्रा हिच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मीरा बडवे या पुण्यामध्ये स्वत:च्या घरात अंध मुलांना प्रशिक्षण देत आहेत. १८ वर्षांनंतर अंध विद्यार्थ्यांना शाळेत येऊ दिले जात नाही. मग अशा मुलांना शिकवण्यासाठी त्या गेली १८ वर्षे कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातल्या चेतना सिन्हा यांनी माणदेशी महिला बँकेची स्थापना केली आहे. काही वर्षांपूर्वी एक महिला त्यांच्याकडे आली होती. पावसाळ्याआधी तिला तिच्या घरावर छप्पर घालायचे होते, म्हणून ती पैसे साठवत होती. मात्र बँकेमध्ये तिला खाते उघडून देत नव्हते. ग्रामीण भागातील महिलांसाठी बँक असावी म्हणून त्यांनी बँकेची सुरुवात केली. याचबरोबरीने दुर्गम भागातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे म्हणून बस तयार केली. बसमध्येच हे वर्ग भरविले जातात. १२ व्या वर्षी लग्न झालेल्या पश्चिम बंगालमधल्या सुभासिनी मिस्त्री यांच्यावर २३ व्या वर्षी विधवा होण्याची वेळ आली. औषध न मिळाल्यामुळे त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. तेव्हाच त्यांनी ठरवले, छोट्या गावातून औषध न मिळाल्यामुळे मृत्यू व्हायला नको म्हणून एका झोपडीत रुग्णसेवा देण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या एका मुलाला डॉक्टर केले. झोपडीत सुरू झालेल्या वैद्यकीय सेवेचा आज वटवृक्ष झाला आहे. ५ हजार चौरस फुटांच्या जागेवर सर्वांच्या मदतीने आज त्यांनी ह्युमॅनिटी नावाचे रुग्णालय सुरू केले आहे. आयआयटीमधून पास झाल्यावरअक्षय सक्सेना आणि कृष्णा राजकुमार या दोन तरुणांनी हा वेगळा मार्ग निवडला. काही जणांची बुद्धिमत्ता असते, मात्र प्रशिक्षण, योग्य दिशा न मिळाल्यामुळे ते मागे राहतात. अशाच मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी अवंती नावाची संस्था स्थापन केली. हुबळी येथे राहणाऱ्या श्रावणी पवार यांनी महिलांना सक्षम करताना सुरक्षा क्षेत्रातही त्यांना आणण्यासाठी त्यांनी सेफ हॅण्ड २४ बाय ७ नावाची कंपनी सुरू केली. (प्रतिनिधी)
प्रेरणादायी समाजकार्याचा सन्मान
By admin | Published: September 11, 2014 1:11 AM