Join us

निवडणूक कर्मचाऱ्याचा जीव वाचविणाऱ्या पोलिसांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 2:25 AM

पोलिसांच्या या तत्परतेबद्दल मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदानाच्या दिवशी प्रसंगावधान राखत निवडणूक कर्मचाºयाचा जीव वाचविणारे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी व पोलीस नाईक वैभव गिरकर यांचा गुरुवारी मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

विक्रीकर विभागाचे अधिकारी असलेले जयंत ढोले मतदानाच्या दिवशी मलबार हिल मतदारसंघातील एका मतदान केंद्रांचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. मतदान सुरू असताना ढोले यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्या वेळी त्या मतदान केंद्रात उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी आणि पोलीस नाईक वैभव गिरकर यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता इतर सहकाऱ्यांच्या मदतीने जयंत ढोले यांना स्वत:च्या खांद्यावर उचलून वाहनाकडे धाव घेतली. स्वत:च्या वाहनातून त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. पोलिसांनी दाखविलेल्या या प्रसंगावधानामुळे जयंत ढोले यांना योग्य वेळेत उपचार मिळाले आणि त्यांचा जीव वाचला.पोलिसांच्या या तत्परतेबद्दल मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आज छोटेखानी समारंभात त्यांचा सत्कार करण्यात आला. अशा प्रकारचे कार्य तुमच्या हातून नेहमीच घडो. पोलीस विभाग रक्षणासोबतच माणुसकीसाठीदेखील अग्रेसर ठरो, अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी जोंधळे यांनी दिल्या.

टॅग्स :मुंबईपोलिस