मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलं ट्विट केलं. एकीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजित पवार यांनी माघारी न परतण्याचे संकेत त्यातून दिले. तसेच, मी राष्ट्रवादीसोबतच कायम राहीन अन् शरद पवार हेच आमचे नेते असतील, असेही अजित पवारांनी ट्विट करुन म्हटलंय. अजित पवारांच्या या ट्विटला रिट्विट करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांना परत येण्याचं आवाहन केलंय.
शनिवारी सकाळीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज ट्विटरवर सक्रीय झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या ट्विटचा सिलसिला सुरूच राहिला. अजित पवार यांनी एक धक्कादायक ट्विट केलंय. त्यामध्ये मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत, असेही अजित पवारांनी म्हटलंय. त्यासोबच भाजपा आणि राष्ट्रवादी मिळून राज्याला 5 वर्षांसाठी स्थिर सरकार देईन. लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या हितासाठी आम्ही काम करू, असेही अजित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलंय. जयंत पाटील यांनी अजित पवारांचे हे ट्विट रिट्विट करत, अजित पवारांना भाजपासोबत न जाण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतल्यांचं सांगितलंय. तसेच, आपण परत या, असे आवाहनही पाटील यांनी केलंय.
दरम्यान, शनिवारी सकाळी अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, काल दिवसभरात अजित पवार यांनी एकही ट्विट केलं नव्हतं. अखेर आज अजित पवार ट्विटरवर सक्रीय झाले. त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींचे आभार मानले. आम्ही राज्यात स्थिर सरकार देऊ आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी काम करू, असं आश्वासन अजित पवारांनी ट्विटमधून दिलं. त्यानंतर, आपण कायम राष्ट्रवादीतच राहणार असल्याचंही स्पष्ट केलंय.