विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर देणार; महायुतीच्या बैठकीत निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 07:13 AM2023-11-04T07:13:17+5:302023-11-04T07:13:37+5:30

मराठा, ओबीसी, शेतकरी, कामगारांसाठी सरकारने सातत्याने देण्याची भूमिका घेतलेली आहे.

Respond appropriately to opposition criticism; Decision of Grand Alliance meeting | विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर देणार; महायुतीच्या बैठकीत निर्धार

विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर देणार; महायुतीच्या बैठकीत निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मराठा आरक्षणासह विरोधकांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला आता जशास तसे आणि एकत्रितपणे उत्तर देण्याचा निर्धार महायुतीतील तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत शुक्रवारी करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री ही बैठक झाली. बैठकीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला तिन्ही पक्षांचे मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते.  

मराठा, ओबीसी, शेतकरी, कामगारांसाठी सरकारने सातत्याने देण्याची भूमिका घेतलेली आहे. मात्र, तरीही विरोधक सातत्याने आरोप करतात. हे आरोप आता  आक्रमकपणे खोडून काढण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. अडीच वर्षाच्या सत्ताकाळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते; पण ते घरी बसून सरकार चालवत होते. आज मीच नाही तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेतेही तेवढ्याच झपाट्याने काम करत आहेत. अशावेळी विरोधकांच्या आरोपांमधील हवा काढलीच पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विरोधकांकडून एखाद्या मुद्द्यावर अजेंडा निश्चित केला जातो आणि आपल्याला त्याची उत्तरे देत राहावी लागतात. त्यापेक्षा हा अजेंडा आपणच निश्चित केला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

महायुतीच आरक्षण देणार : फडणवीस
मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले. ते हायकोर्टात टिकवले. त्यानंतर मविआ सरकारच्या काळात टिकले नाही. आपले महायुती सरकारच आरक्षण देऊ शकते, असा समाजालादेखील विश्वास आहे, असे उपमुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले.

प्रत्येक तालुक्यात तिन्ही पक्षांचे संयुक्त मेळावे 
विरोधकांच्या आरोपांना एकत्रितपणे तिन्ही पक्षांनी सडेतोड उत्तर तर दिले पाहिजेच; पण लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांची यंत्रणा संयुक्तपणे कार्यरत राहिली पाहिजे, असा आग्रह तटकरे यांनी धरला. शिंदे फडणवीस यांनी त्यास दुजोरा दिला.

मराठा समाजाला कोणी काय दिले? : लेखाजोखा मांडणार
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मराठा समाजाला सरकारने काय काय दिले याचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. फडणवीस यांनी मराठा समाजासाठी कोणत्या सोयीसुविधा दिल्या, याची माहिती दिली. विरोधकांना आपण निरुत्तर करू शकू, अशी सगळी आकडेवारी आपल्याकडे आहे, मात्र ती ठामपणे सर्वांसमोर जाऊन सांगण्याची गरज आहे, असे शिंदे व फडणवीस म्हणाले.

Web Title: Respond appropriately to opposition criticism; Decision of Grand Alliance meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.