मुंबई जीएसटी सेवा केंद्राला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 05:31 AM2019-01-21T05:31:49+5:302019-01-21T05:31:57+5:30
केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा (सीजीएसटी) विभागाच्या मुंबई (पूर्व) सेवा केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबई : केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा (सीजीएसटी) विभागाच्या मुंबई (पूर्व) सेवा केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जुलै २०१७ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत या केंद्राचा लाभ २ हजार ७३२ जणांनी प्रत्यक्ष व २१५ जणांनी ई मेल द्वारे घेतला आहे. या कार्यालयातर्फे नागरिकांना रिटर्न फाईल करण्यासाठी विनामूल्य केंद्र उभारण्यात आले आहे त्याचा लाभ ६५० जणांनी घेतला आहे.
१५ फेब्रुवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत एकूण ६५० जणांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. परळ येथील विभागाच्या कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी विनामूल्य रिटर्न फाईल केंद्र उभारण्यात आले आहे. राज्यातले हे एकमेव केंद्र आहे. सीए अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी व सीजीएसटीचे अधिकारी या केंद्रात उपलब्ध असतात. वेस्टर्न इंडियन रिजनल कॉन्सिल आॅफ इन्स्टिट्यूट आॅफ चार्टड अकाऊंटंट या संस्थेच्या सहकार्याने हे केंद्र चालवले जात आहे. त्यांच्यातर्फे आर्टिकलशिप करण्यासाठी सीए चे विद्यार्थी उपलब्ध करुन दिले जातात.
>विनामूल्य लाभ
हे रिटर्न फाईल करण्यासाठी खासगी सल्लागाराकडे गेल्यास किमान दीड हजार ते २ हजार रुपये मोबदला आकारला जातो मात्र सीजीएसटी विभागाने ही पूर्णत: विनामूल्य सुविधा पुरवल्याने नागरिकांना त्याचा लाभ होत आहे. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे केंद्र सुरु असते. नागरिकांनी या केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सीजीएसटी (पूर्व) चे आयुक्त विजय रिशी यांनी केले.