Join us

'पवारांच्या हत्येचा कट', तक्रारदाराला पत्रकार भाऊ तोरसेकरांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 3:51 PM

निवडणुकांच्या काळात आणि गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर जातीय

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या हत्येचा कट केला जात असल्याची तक्रार पुण्यातील सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. गोपनीय तातडीची तक्रार म्हणून लक्ष्मीकांत मोहनलाल खाबिया यांनी ही तक्रार दाखल केली असून सोशल मीडियावरील मेसेजेसचा संदर्भ त्यांनी दिला आहे. या तक्रारीनंतर पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी आपली बाजू मांडताना फेसबुकच्या माध्यमातून मतं मांडलं आहे. 

निवडणुकांच्या काळात आणि गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करून सामाजिक व राजकीय ऐक्याला तडा जाईल, असे कृत्य करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाऊ तोरसेकर, घनशाम पाटील आणि इतर लोकांकडून युट्यूबवर (postman, thinktank etc) या चॅनेलच्या माध्यमातून शरद पवार यांना संपविले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशा आशयाची भाषणे होत आहेत. हे चिथावणीखोर वक्तव्ये माझ्या निदर्शनास आल्यामुळे ही तक्रार दाखल करत असल्याचं खाबिया यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीचा संदर्भ देत भाऊ तोरसेकर यांनी आम्ही आमंत्रणाच्या प्रतीक्षेत असल्याचं म्हटलंय.  

''ज्यांनी कोणी तक्रार केली त्यांना तसे स्वातंत्र्य व अधिकारही आहे. पण त्यानंतर धमक्या देणारे पवारांच्या पक्षाच्या युवक संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या संघटनेचा तसा अजेंडा असू शकतो. तर त्यात बदल करण्याचा किंवा बदल मागण्याचा मला कुठलाही अधिकार नाही. उलट मी त्यांच्याशी त्यातही सहकार्य करायला तयार आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातपाय तोडायच्या धमक्या दिलेल्या आहेत. त्यांच्याशी सहकार्य करण्यासाठी कधी, कुठे हजर व्हायचे ते त्यांनी अगत्याने कळवावे. घनशाम पाटील, अक्षय बिक्कड आणि भाऊ तोरसेकर तिथे तितक्याच अगत्याने हजर रहातील. जागा व दिवस वेळ त्यांनी ठरवावी. आमची अट एकच आहे. अशा सहिष्णू गांधीवादी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खुद्द शरद पवार बसलेले असावेत. आम्ही आमंत्रणाच्या प्रतिक्षेत आहोत. साहेब! '', असे भाऊ तोरसेकर यांनी म्हटलंय. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसपत्रकारगुन्हेगारीपुणे