लस खरेदीच्या जागतिक निविदेला ८ पुरवठादारांचा प्रतिसाद, आवश्यक कागदपत्रांसाठी १ जूनपर्यंत मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 07:25 PM2021-05-25T19:25:11+5:302021-05-25T19:28:07+5:30
Corona Vaccine : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठी महापालिकेने एक कोटी लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १२ मे रोजी जागतिक स्तरावर स्वारस्य अभिव्यक्ती मागविण्यात आल्या.
मुंबई - कोविड १९ ला प्रतिबंध करणाऱ्या लस खरेदीसाठी महापालिकेने मागविलेल्या जागतिक स्वारस्य अभिव्यक्तीस आतापर्यंत आठ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. यामध्ये सात पुरवठादारांनी स्पुतनिक फाईव्ह तर एका पुरवठादाराने स्पुतनिक लाईट या कोविड लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे. तर उर्वरित एका पुरवठादाराने एस्ट्राझेनका फायजर या लसीचा पुरवठा करण्यास तयार आहे. मात्र नव्याने आलेल्या पुरवठादारांना काही कागदपत्रांची पूर्तता करता यावी, यासाठी या निविदेची मदत १ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठी महापालिकेने एक कोटी लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १२ मे रोजी जागतिक स्तरावर स्वारस्य अभिव्यक्ती मागविण्यात आल्या. शेवटच्या दिवशी १८ मे रोजी पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिल्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी या निविदेला २५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तर मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत आणखी तीन कंपन्या असे एकूण आठ संभाव्य पुरवठादार पुढे आले आहेत. त्यामुळे या पुरवठादारांनाही आता कागदपत्रे सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.
या चार बाबींची पडताळणी होणार....
लस पुरवठा करण्यास इच्छुक पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस उत्पादीत करीत असलेल्या कंपन्या या दोन्ही दरम्यान असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहण्यात येणार आहेत. जेणेकरुन लस पुरवठा हा दिलेल्या मुदतीत आणि सुरळीपणे होईल, याची खात्री पटेल. तसेच नेमक्या किती दिवसात लस पुरवठा होईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या चार मुख्य पैलूंचा अभ्यास केला जात आहे.
म्हणूनच दिली मुदतवाढ...
सोमवारी एका संभाव्य पुरवठादाराबरोबर प्रशासनाने ऑनलाईन चर्चा केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी चार संभाव्य पुरवठादारांसोबत ऑनलाईन चर्चा करण्यात आली. तर नव्याने तीन प्रस्ताव प्राप्त झाल्याने त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता होणे आवश्यक आहे. त्यामुळे १ जूनपर्यंत निविदेला मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार दिलेल्या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असेल. तसेच आणखी कोणत्या पुरवठादाराला प्रस्ताव सादर करायचा असल्यास संपूर्ण कागदपत्रांसोबतच पूर्ण प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. सर्व प्रस्तावांची कागदपत्रांसह पूर्ण छाननी करुन प्रशासनाकडून वाटाघाटी करण्यात येत आहेत.