फास्टॅग कॅश बॅकला प्रतिसाद; तीन लाख ४५ हजार १५५ वाहनधारकांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:07 AM2021-01-20T04:07:34+5:302021-01-20T04:07:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पथकर नाक्यावरून कॅशलेस व वेगवान प्रवासासाठी फास्टॅगधारक कार, जीप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पथकर नाक्यावरून कॅशलेस व वेगवान प्रवासासाठी फास्टॅगधारक कार, जीप व एसयूव्ही वाहनधारकांना जाहीर केलेल्या ५ टक्के कॅशबॅकला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सात दिवसांत तीन लाख ४५ हजार १५५ वाहनधारकांनी कॅशबॅकचा लाभ घेतला आहे. आता पथकर नाक्यांवर फास्टॅग प्रणालीच्या १०० टक्के अंमलबजावणीसाठी महामंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
११ जानेवारीपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाक्यावर फास्टॅगधारक कार, जीप व एसयूव्ही वाहनांना प्रत्येक फेरीला पाच टक्के कॅशबॅक लागू झाली. ११ ते १७ जानेवारी या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाक्यावर एकूण तीन लाख ४५ हजार १५५ वाहनधारकांनी कॅशबॅकचा लाभ घेतला. या मोबदल्यात महामंडळाने १९ लाख आठ हजार ५९७.८५ रकमेचा परतावा वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यामध्ये जमा केला.
वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या पथकर नाक्यावरील सर्व मार्गिका फास्टॅग प्रणालीने अद्यावतीकरणाचे काम २२ जानेवारीपर्यंत सुरू राहील. २६ जानेवारीपासून फास्टॅगधारक वाहनांना प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी दिली.
......................