घाटकोपर, पवई, चांदिवलीत लॉकडाऊनला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:06 AM2021-04-11T04:06:38+5:302021-04-11T04:06:38+5:30
मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊनला घाटकोपर, साकीनाका, पवई आणि चांदीवली परिसरात चांगला प्रतिसाद ...
मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊनला घाटकोपर, साकीनाका, पवई आणि चांदीवली परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दुकाने वगळता, इतर दुकाने, शॉपिंग सेंटर, मॉल बंद ठेवण्यात आले होते.
घाटकोपर स्थानक, लालबहादूर शास्त्री मार्ग, अंधेरी-घाटकोपर रस्त्यावर नेहमीसारखी वाहनांची वर्दळ नव्हती. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पोलिसांची पथके गस्त घालीत होती. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांचा वावर कमी दिसून आला. एरवी वाहतूककोंडीचा सामना कराव्या लागणाऱ्या साकीनाका परिसरातील रस्त्यांवर सकाळपासून शुकशुकाट होता. बहुतांश खासगी कार्यालये बंद असल्याने दत्ता सामंत चौक, मित्तल इस्टेट, चांदिवली पोस्ट ऑफिस भागात फारशी रहदारी नव्हती.
गेल्या सहा दिवसांपासून राज्य सरकारच्या आदेशाला हरताळ फासणाऱ्या चांदिवलीतील दुकानदारांनी वीकेंड लॉकडाऊनला मात्र प्रतिसाद दिला. येथील जवळपास ९५ टक्के दुकाने बंद होती. डी-मार्ट सुरू राहील की नाही, याबाबत संभ्रम असल्याने, काही ग्राहकांनी चांदिवलीतील डी-मार्टसमोर रांगा लावल्या. कोणतीही सूचना न देता, आस्थापन बंद ठेवण्यात आल्याने ग्राहकांनी रोष व्यक्त केला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत सर्व ग्राहकांना घरी जाण्याचे आवाहन केले.
पवईतही लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद मिळताना दिसून आला. फिल्टरपाडा, मोरारजीनगर, आयआयटी, हिरानंदानी परिसरातील दुकाने बंद होती. पवई उद्यान परिसरात पोलिसांनी नाकाबंदी लावल्याने विनाकारण बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण घटले. मात्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे निदर्शनास आले. रिझर्व बँकेच्या परीक्षेसाठी पवईतील सेंटरवर आलेल्या उमेदवारांची ही गर्दी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मद्यपींनी मात्र लॉकडाऊनचे पालन केले नाही. असल्फा, मरोळ, हिरानंदानी, चांदिवली परिसरात काही जण भर उन्हात दारूसाठी वणवण भटकताना दिसले. वाइन्स शॉप बंद ठेवण्याचे निर्देश असल्यामुळे बंद दाराआड दारूची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले.