मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो - ३ च्या मार्गाचे विद्युतीकरण आणि ट्रॅक्शनच्या कामाकरिता एमएमआरसीने आयोजित केलेल्या पूर्व अर्हता बैठकीला विद्युत क्षेत्रातील सात कंपन्यांनी हजेरी लावली. या कंपन्यांना २२ फेब्रुवारीपर्यंत एमएमआरसीकडे निविदा सादर कराव्या लागणार आहेत.मेट्रो ३ च्या विद्युतीकरणाच्या कामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने शनिवारी विद्युत क्षेत्रातील नामांकित कंपन्यांची पूर्व अर्हता बैठक बोलाविली होती. या बैठकीला विद्युत क्षेत्रातील सात कंपन्यांनी हजेरी लावली. यामध्ये मे. लार्सन टुब्रो, मे. वोल्टाज, मे. आलस्टोम, मे. टाटा प्रोजेक्ट लि., मे. सिमन्स लि. आदी कंपन्यांचा समावेश होता.एमएमआरसीने मेट्रोच्या विद्युतीकरणाचे काम दोन पॅकेजमध्ये करण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या पॅकेजमध्ये उपरी संकर्षण प्रणाली (ओव्हरहेड ट्रॅक्शन सिस्टीम), साहाय्यकारी उपकेंद्रे, केबल वितरण जाळे आदी कामांचा समावेश राहील. तर दुसऱ्या पॅकेजमध्ये मुख्य स्थानकाचे विद्युतीकरण, ११0 केव्ही केबलिंग, साहाय्यकारी स्वीचन केंद्र, स्काडा आदी कामे अंतर्भूत असणार आहेत. मेट्रोच्या भुयारी प्रकल्पासाठी स्काडासारख्या अद्ययावत यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.पूर्व अर्हता निविदा दस्तावेज एमएमआरसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून पूर्व अर्हता निविदा २३ फेब्रुवारीपर्यंत सादर करता येणार आहेत. (प्रतिनिधी)
मेट्रो ३ च्या विद्युतीकरणाच्या कामासाठी निविदांचा प्रतिसाद
By admin | Published: January 24, 2016 1:15 AM