मुंबई : एसटी महामंडळ स्थानक-आगारातील रोजच्या तिकीट विक्रीतून आलेल्या रकमेची जबाबदारी संबंधित राष्ट्रीयकृत बँकांची असणार आहे. यामुळे संबंधित बँकांनी थेट आगारातून रक्कम जमा करावी, असे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले आहेत. मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महामंडळाच्या संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या २८४व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.राज्याच्या विविध मार्गांवर १६ हजारांपेक्षा जास्त एसटी बस धावतात. या एसटीतून दैनंदिन होणारी तिकीट विक्रीची रक्कम एसटीतील वाहक संबंधित स्थानक -आगारात जमा करतो. दरदिवशी सुमारे १५ कोटी रुपये रोख स्वरूपात विविध आगारात जमा होतात. एसटी महामंडळाकडे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे, एसटीवर दरोडा घालण्याच्या घटना घडतात. नुकतेच सोलापूर आगारातील १५ लाखांची रक्कम अशा पद्धतीने लांबवण्यात आली होती. हे रोखण्यासाठी रावते यांनी आगाराजवळील बँकांनाच रक्कम जमा करून घेण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे आता ही जबाबदारी संबंधित बँकांची असणार आहे.
आगारातील रकमेची जबाबदारी बँकांची, एसटी आगारातून रक्कम जमा करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 5:52 AM